वणीतील ढोकेश्वर मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी चौकशीच्या रडारवर
शाखा व्यवस्थापक चौकशीसाठी रवाना
रवि ढुमणे, वणी: लासलगाव येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीत गुंतवणूकदार तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक झाल्याची तक्रार मनमाड येथील एका गुंतवणूकदाराने करताच सोसायटीच्या अनेक शाखेवर धाड टाकून दस्तऐवज हस्तगत करण्यात आले. आता वणी शहरातील ढोकेश्वर मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी वणी शाखेच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याची चर्चा शहरात रंगायला लागली आहे.
काय आहे हे प्रकरण ?
वणी शहरात ढोकेश्वर मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीने सुसज्ज शाखा उघडून अत्यंत कमी पैशात सुशिक्षित बेरोजगार असलेल्या युवकांना क्रेडिट सोसायटीत नोकरी दिली. अत्यंत कमी पैशात नोकरी असल्याने युवक आकर्षित झाले. सोबतच अनेक गुंतवणूकदार सुद्धा तयार करण्यात आले. इतर पतसंस्थाच्या तुलनेत जास्त व्याजदर जाहीर केला. गुंतवणूकदार व दरमहा ठेवीदाराची संख्या झपाट्याने वाढत गेली.
मात्र नुकताच या संस्थेच्या माध्यमातून गुंतवणूकदाराची फसवणूक झाल्याचे वृत्त समजताच, वणी शाखेतील व्यवस्थापकाला चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू झाली.
या क्रेडिट सोसायटीत गुंतवणूकदार असलेल्या ठेवीदारांनी पै पै जमा केलेली रक्कम जास्त व्याजदर मिळतो म्हणून गुंतवली, परंतु हे प्रकरण समोर आल्याने शहरातील ठेवीदारांच्या पैशाचे काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अद्याप तरी या संस्थेच्या विरुद्ध तक्रार झाली नाही. मात्र लासलगाव येथील प्रकरण उघडकीस आल्याने बहुतांश ग्राहक बुचकाळ्यात पडले आहे.