मुंगोली गावाच्या पुनर्वसनाची समस्या अधांतरी

ग्रामसभेत जागेचा ठराव मंजूर, ग्रामस्थांना वेकोलीच्या मंजुरीची प्रतीक्षा

0

विलास ताजने वणी: वणी तालुक्यातील मुंगोली गावालगत असलेल्या कोळसा खाणीमूळे ग्रामस्थांना अनेक समस्याचा सामना करावा लागतो. तरीही गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत शिंदोला लगतच्या कुर्ली शिवारातील खाजगी जागेचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र सदर ठरावाला वेकोली प्रशासन मंजूर करेल की, नाकारेल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

वणी तालुक्यातील मुंगोली, माथोली, साखरा, कोलगाव आदी गाव शिवारात कोळसा खाणी आहे. यापैकी मुंगोली या ७०० लोकसंख्या असलेल्या गावालगत उत्खनन केले आहे. परिणामी सर्व घरांच्या भिंतीला तडे गेले आहे. काही घरे कोसळले. कोळशाच्या धुळीमुळे शेतातील पिके काळवंडलेली असते. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. ग्रामस्थानाही दमा, त्वचेचे रोग, एलर्जी अशा रोगांना बळी पडावे लागते.

ग्रामस्थ जीव धोक्यात घालून जीवन जगत आहेत.परंतु वेकोली प्रशासन ग्रामस्थांशी भावनिक खेळ खेळत आहे. महाराष्ट्रदिनी मुंगोली येथे पार पडलेल्या ग्रामसभेत कुर्ली शिवारातील शेतजमीनीची निवड गाव पुनर्वसनासाठी केली होती.परंतु उपविभागीय अधिकारी वणी यांनी वेकोली अधिकाऱ्यांना जुलै महिन्यात गावाच्या पुनर्वसनासाठी  खाजगी जागेऐवजी शासकीय जागा उपलब्ध असल्याची माहिती पत्राद्वारे दिली.

सदर शासकीय जागा ही जंगलालगत आणि शिंदोला बाजारपेठेपासून दूर अंतरावर असल्याने त्या जागेला ग्रामस्थांनी नाकारले. पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरपंच रुपेश ठाकरे यांनी वेकोली प्रशासनाला लेखी कळवून ग्रामसभेत ग्रामस्थांचे मत विचारात घेऊन निर्णय घेण्यात यावा असे सुचवले. त्याअनुषंगाने १० सप्टेंबरला ग्रामसभा पार पडली. सभेत ग्रामस्थांनी खाजगी जागेला पसंती देत ठराव मंजूर केला.

ग्रामसभेत लोकांचा मोठा सहभाग

कुर्ली शिवारातील शिंदोला येथील विठ्ठलराव सुरपाम, देविदास सुरपाम, भाऊजी गौरकार, पांडुरंग सुरपाम, तुळशीराम पंधरे, भगवान भलमे हे शेतकरी मुंगोली गावाच्या पुनर्वसनासाठी शेतजमिन देण्यास तयार आहेत. मात्र त्यांना जागेचा योग्य मोबदला आणि वेकोलीत नोकरी हवी आहे.अटींची पुर्तता न झाल्यास जागा देणार नाही. असे मत प्रस्तुत प्रतिनिधी जवळ शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

मात्र वेकोली प्रशासनानी सदर शेतमालकांच्या मागण्या मान्य न केल्यास मुंगोली गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा गुंतागुंतीचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेनंतर वेकोली प्रशासनाने शिंदोला येथील शेतकऱ्यांसोबत काहीच संपर्क केला नसल्याचे  शेतमालकांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.