जितेंद्र कोठारी, वणी: डीआयजी पथकाने वणीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर धाड टाकत एकच खळबळ उडवून दिली होती. पथकाने एकाच वेळी शहरात चालणारे 4 मटका अड्डा व 2 सुगंधीत (प्रतिबंधीत) तंबाखू विक्रेत्यावर धाड टाकली होती. अमरावतीहून टीम येऊन वणीत कारवाई करीत असल्याने या प्रकरणी वणी पोलीस ठाण्याचे पितळ उघडे पडले होते. या प्रकरणी कर्मचा-यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे बोलले जात होते. अखेर या प्रकरणी वणीत अवैध धंद्यांना चालना देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना जवाबदार ठरविण्यात आले आहे. त्यानुसार 23 कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यातील 4 कर्मचा-यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली तर 19 कर्मचा-यांची पगारवाढ (इंक्रिमेन्ट) रोखण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी रात्री आदेश काढल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र अधिका-यांना सोडून कर्मचा-यांना तर बळीचा बकरा बनवण्यात येत नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या प्रकरणी डीबी पथक इंचार्ज एएसआय सुदर्शन वानोळे, ना.पो.का. अशोक टेकाडे, ना.पो.का पंकज उंबरकर व SDPO पथकाचे ना.पो.का इकबाल शेख यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच वणी पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांसह 19 कर्मचा-यांची 3 वर्षासाठी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांची नोटीस गुरुवारी रात्री प्राप्त झाल्याची माहिती आहे.
एकीकडे वणी परिसरातील अवैध धंदे बंद असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र शहरात आणि उपविभागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय फोफावला आहे. याची माहिती अमरावती येथील पोलीस निरीक्षक कार्यालयात पोहोचली. यावरून अमरावतीतील पथकाने वणीत येऊन रेकी केली. अनेक ठिकाणावर स्वत: जाऊन मटका अड्डा सुरू असल्याची खात्री केली. तसेच शहरात सुरू असलेल्या प्रतिबंधीत तंबाखूच्या विक्रीबाबतही संपूर्ण पुरावे गोळा केले. परिसरात अवैध धंदे जोमात सुरू असल्याची खात्री झाल्यावर शनिवारी 29 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एकाचवेळी शहरात सुरू असलेले 4 मटका अड्डे व 2 प्रतिबंधीत तंबाखूची विक्री करणा-या दोन व्यावसायिकांवर धाड टाकली.
या कारवाईत सुमारे 13.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच मटका प्रकरणी 43 जणांवर तर तंबाखू विक्री प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उप महानिरीक्षक अमरावती चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने वणीत केलेल्या कार्यवाही नंतर पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची अपेक्षित होती. मात्र पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा केल्याची चर्चा आहे.
बरखास्त करण्यात आलेल्यापैकी एक पोलीस कर्मचारी पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मागील 3 महिन्यापासून वैधकीय रजेवर होता. तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नेमणूक असलेल्या एका कर्मचाऱ्यालाही दोषी ठरविण्यात आले आहे.
वणीत क्रिकेट सट्टा व मटकाच्या व्यवसायात दर दिवशी लाखो करोडो रुपयांची उलाढाल होत असते. मोठ्या प्रमाणात सुरु असलेले अवैध व्यवसायाबाबत पोलीस अधिकाऱ्यांना माहिती नसेल का ? अवैध धंदे सुरु करण्याची परवानगी वरिष्ठ देतात की कर्मचारी देतात का ? या कारवाईच्या निमित्ताने असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
Comments are closed.