प्रभाग क्र. 4 मधून होतकरू तरुण दिगांबर उर्फ वसंत गायकवाड सज्ज !
ओळख इच्छुक उमेदवारांची: विकासाचा असमतोल दुर करणार
बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 4 मध्ये एक नव्या उमेदवाराची दमदार एन्ट्री झाली आहे. गायकवाड फैलमधील रहिवासी, सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय आणि अडल्या नडल्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असलेले दिगांबर उर्फ वसंत विठ्ठल गायकवाड हे आता लोकप्रतिनिधी म्हणून मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. ‘होतकरू’ ही त्यांची ओळख आता ‘हक्काचा आवाज’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. एका भागात विकास तर दुस-या भागात विकासाची गंगा अद्याप पोहोचली नाही, हा असमतोल दूर करणार असे रणशिंग त्यांनी फुंकले आहे.
संघर्ष ते समाजसेवेपर्यंतचा प्रवास
दिगंबर उर्फ वसंत गायकवाड यांचा प्रवास हा संघर्षातून घडलेला आहे. मोलमजुरी, छोटे-मोठे काम करत त्यांनी 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर त्यांनी घरच्या हॉटेल व्यवसायात हातभार लावण्यास सुरुवात केली. येथे त्यांनी कूकपासून व्यवस्थापनापर्यंतची जबाबदारी पार पाडत कष्टाची चव अनुभवली. एक उत्तम कूक म्हणूनही त्यांची ओळख आहे. चवीचे उत्तम ज्ञान असल्याने त्यांनी पुढे मसाले तयार करण्याचा गृहउद्योग सुरू करून स्वत:चा व्यवसाय उभा केला. मात्र, व्यवसायाच्या जोडीने सामाजिक बांधिलकी जपण्याची त्यांची तळमळ कधीच कमी झाली नाही.
सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवताना त्यांनी एका पक्षाच्या माध्यमातून विविध आंदोलनांत व उपक्रमात भाग घेतला. पण पुढे पक्षविरहित राजकारणाचा मार्ग स्वीकारत, त्यांनी थेट जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. आजही ते प्रभागातील नागरिकांच्या अडचणींना स्वतःची जबाबदारी मानून धावून जातात. त्यांच्या मते, लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ निवडणुकीपुरता चेहरा नसून, तो जनतेच्या प्रत्येक समस्येचा भागीदार असावा.
विकासाचा असमतोल संपवणार!
प्रभाग 4 मध्ये पाणीटंचाई, रस्त्यांची दुर्दशा, नाल्यांची अस्वच्छता, घरपट्ट्यांचे प्रश्न हे आजही सुटलेले नाहीत. “घरपट्ट्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला पाहिजे. तसेच, युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत,” असा ठाम निर्धार गायकवाड व्यक्त करतात. विकासाचा असमतोल ही प्रभाग 4 मधली सर्वात मोठी समस्या आहे. एका भागात रस्ते, पाणी, पथदिवे, स्वच्छता अशा सर्व सोयी सुविधा दिसतात तर प्रभागातील काही वस्ती मात्र अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. एक भाग चकाचक तर दुसरा भाग अस्वच्छतेने भरलेला. हा असमतोल दूर करून सर्व भागांचा समतोल विकास हेच त्यांचे प्रमुख ध्येय आहे.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये गायकवाड फैल, जैताई नगर, मनिष नगर, झेडपी कॉलनी, गुरुवर्य कॉलनी, सदाशिव नगर, लक्ष्मी नगर, नांदेपेरा रोड, हॉटेल प्रसाद, सुगम हॉस्पिटल परिसर इ. भागांचा समावेश होतो. या भागात काही काळात विकासाच्या गाडीला ब्रेक लागलेला आहे. नागरिक आता सशक्त, कष्टाळू आणि लोकाभिमुख नेतृत्वाच्या शोधात आहेत. दिगांबर गायकवाड यांची उमेदवारी ही केवळ निवडणुकीतील एक पर्याय नसून, ती प्रभागाच्या नव्या भविष्याची सुरुवात ठरू शकते. पक्षाकडून तिकीट मिळाले तर अधिकृत उमेदवार म्हणून, अन्यथा अपक्ष म्हणून ते मैदानात उतरणार आहेत. अशी भावना दिगांबर गायकवाड यांनी वणी बहुगुणीजवळ व्यक्त केली. (आपणही नगर पालिकेसाठी इच्छुक असाल तर 9096133400 (संपादक वणी बहुगुणी) या क्रमांकावर संपर्क साधा.)

Comments are closed.