कुंभ्यात सुरू झाली जिल्ह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार हायटेक शिक्षण
रवी ढुमणे, वणी, ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी उपविभागातील मारेगाव तालुक्यात कुंभा येथे जिल्ह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी सुरू झावी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागात बदलून आलेल्या पर्यवेक्षीका सुरेखा तुराणकर यांनी ग्रामीण भागातील मुलांना शहरातील महागड्या काॅन्व्हेंट सारखे ज्ञान मिळावे असा हेतू डोळ्यासमोर ठेवून अंगणवाडी डिजीटल केली आहे. यात त्यांना अंगणवाडी सेवीका बेबी मत्ते यांनी सहकार्य केले.
सध्या हायटेक असलेल्या खासगी शाळांकडे पालकांचा कल जणू वाढलाच आहे. सुसज्य इमारती व अमाप शुल्क घेवून खासगी शाळा जणू कात टाकायला लागली आहे. स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील शाळा खासगी शाळांच्या तुलनेत कमी पडताना दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामस्थांची अनास्था आणि प्रशासनामध्ये इच्छाशक्तीचा अभाव या दोन गोष्टीमुळे उच्च शिक्षण देणाऱ्या शाळा मागे पडल्या असल्याचे दिसत असतांनाच आदिवासी असलेल्या मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे पर्यवेक्षीका असलेल्या सुरेखा तुराणकर यांनी अंगणवाडी डिजिटल करून बालकांना वैज्ञानिक ज्ञान देण्याचा मानस आखला. ग्राम पंचायत, ग्रामस्थ यांची मदत घेऊन लोकवर्गणी गोळा करीत कुंभा येथील क्रमांक 1 अंगणवाडी डिजीटल केली.
या जिल्ह्यातील पहिल्या डिजीटल अंगणवाडीचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर, माजी शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, पंचायत समिती सभापती शितल रवि पोटे, उपसभापती संजय आवारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, सहा.गटविकास अधिकारी बोरकर बालसंरक्षण अधिकारी रोशन राउत, कुंभा येथील सरपंच विजय घोटेकार इ. उपस्थित होते. उद्घाटनानंतर पोषण आहार सप्ताह सुध्दा आयोजीत करण्यात आला होता..