प्राध्यापक जेव्हा विद्यार्थी होतो आणि टॉपर राहतो
प्रा. डॉ. दिलीप अलोणे लोककला पदविकेत विद्यापीठात प्रथम
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: रिटायर झाल्यावर आपण काहीच करायचं नाही, असं अनेकजण ठरवतात. छान घरात बसून नातवंडात रमायला अनेकांना आवडतं. नातवंड खेळवण्याच्या वयात एक रिटायर्ड प्राध्यापक कॉलेजला अॅडमिशन घेतो.
एवढंच नव्हे तर वयाच्या 65व्या वर्षी प्रयोगात्मक लोककला पदविकेत तब्बल 97 टक्के गुण मिळवतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात टॉपर येतो. हे मात्र अविश्वसनीयच. ही कमाल केली, वणी येथील प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांनी.
शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. माणूस मुळातच विद्यार्थी आहे. त्याने आजन्म विद्यार्थीच राहावं. हे डॉ. अलोणे यांनी स्वतः कृतीतून करून दाखवलं. अमरावतीच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात त्यांनी ‘या वयात’ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. अत्यंत परिश्रम घेतलेत. त्यांनी जे यश कमावलं, ते नव्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
प्रा. दिलीप अलोणे म्हणजे विविध कलांसह लोककलेला समर्पित व्यक्तिमत्त्व. नकला या कलेच्या जोपासनेसाठी आणि संवर्धनासाठी त्यांचा लढा संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. विविध लोककलांचे उत्सव, लोककलावंतांचे मेळावे ते आयोजित करतात.
जादूगर, कवी, लेखक, हस्तकलावंत, उत्तम शिक्षक, यशस्वी आणि प्रयोगशील शेतकरी असे अनेकविध पैलू त्यांना आहेत.प्राचार्य डॉ. मनीषा ठाकरे, विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत देव यांना ते आपल्या यशाचं श्रेय देतात.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा