‘त्या’ शेतमजुराच्या संग्रहात आहे जवळपास ५० हजार अनमोल ठेवा

पेठ रघुनाथपूरच्या छंदिष्ट दिलीपची ही प्रॉपर्टी पाहून व्हाल थक्क

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः फेसबूक वॉटस्अॅपवर आपण अनेकदा लेख वाचतो. न्यूजपेपर अथवा मॅगजीनमधलेदेखील लेख वाचतो. खूपच आवडलेत तर कधी एखाद दुसरा लेख सेव्ह करून ठेवतो. त्याचं कटिंगही संग्रही ठेवतो. ‘तो’ मात्र तेवढ्यावर थांबत नाही. त्याला आवडलेला लेख तो पुन्हा पुन्हा वाचतो.

आपल्या मोत्यांसारख्या सुंदर अक्षरात हाताने लिहून काढतो. या हस्तलिखितांचा संग्रह बाईंड करून ठेवतो. हा भन्नाट छंद जोपासत आहे, पेठ मंगरूळचा दिलीप वसंतराव महात्मे. त्याने जवळपास 1500 लेख हाताने लिहून काढलेत.

दिलीप महात्मे यांच्याकडे जवळपास 2,500 दुर्मीळ नाणी आहेत.

एवढंच नव्हे तर त्याच्याकडे 30 हजारांच्या वर न्यूजपेपरचे कटिंग आहेत. अडीच हजारांच्या आसपास कॉईन्सचा संग्रह आहे. आपली शेतमजुरीची कामं सांभाळून हा युवक सदोदित नव्या प्रयोगांकडे वाटचाल करीतच आहे.

आजकाल आपल्याला हाताने लिहायचा भारी कंटाळा येतो. सोशल मीडियावर चॅटिंग करताना आपण पूर्ण स्पेलिंग लिहीत नाही. शॉर्टकटच मारतो. साध्या दोन अक्षरी ‘ओके’चाही आपण ‘के’ करतो. पत्र लिहिणे, वाचलेले चांगले उतारे वहीत लिहून काढणे, तर दूरचीच गोष्ट.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात मंगरूळ दस्तगीर नावाचं गाव आहे. या गावातून पायीपायी निघालं तरी पेठ रघुनाथपूरला जाता येतं. इथेच एक शेतमजूर राहतो. त्याचं नाव दिलीप वसंतराव महात्मे.

दिलीप महात्मे यांनी स्वत:च्या अक्षरात जवळपास 1,500 पानं लिहून काढलीत

या दिलीपने जवळपास 1500 पानं लिहून काढलीत. त्याचे थोडेथोडके नव्हेत, तर चार खंड झालेत. ‘प्रसिद्ध व्यक्ती’, ‘प्रेरणा व शोध’ दोन भागांत आणि हिंदीत ‘ऐतिहासिक और भौगोलिक’ अशी छानं शीर्षकही त्याने दिलीत. त्याने जवळपास 10 हजार 478 पानांवर जवळपास 30 हजार कात्रणं गोळा करून चिकटवलीत.

त्यांचे ग्रंथासारखेच खंड करून बांधणी केली. देश-विदेशातल्या जवळपास 2,500 नाण्यांचा संग्रह केला. दिवसभर दुसऱ्यांच्या शेतात राबणारा सामान्य शेतमजूर एवढं कसं करतो, हेच मुळात आश्चर्य आहे. त्याचं हे गुपित त्याने ‘वणी बहुगुणी’सोबत बोलताना शेअर केलं.

दिवस निघाला की, तो दुसऱ्यांच्या शेतावर मजुरीला जातो. पहिल्यांदा दहावीत नापास झाला. प्रयत्न करून दहावी पास झाला. नंतर बारावी केलं. पुढे काही त्याला शिकता आलं नाही. शिक्षणाचा त्याचा संबंध तुटला, मात्र ज्ञानाशी त्याचं नातं अबाधितच राहिलं. ज्ञानाचे संदर्भ तो गोळा करायला लागला. कटिंगच्या बाईंडिंगचे जवळपास 30 खंड त्याच्या संग्रहात आहेत. त्याला तो ‘ग्रंथ’ म्हणतो.

दुसऱ्यांच्या शेतात मुजुरी करून दिलीप भरतो पोट

धामणगावापासून सुमारे 15 किलोमीटर आतमधे इतक्या खोलात त्याचं गाव. त्याच्या गावात पोहचायचं म्हटलं, तरं स्वतःची गाडी असलेली बरी. एस.टी.देखील मंगरूळपर्यंतच जाते. मात्र या गावात 151 देशांचे क्वाईन्स कसे पोहचलेत, याचंही सर्वांना आश्चर्य वाटतं.

दिवाळीला लक्ष्मीपूजनात अनेकजण वेगवेगळ्या क्वाईन्सची पूजा करतात. याच्या घरात तर 151 देशांतल्या क्वाईन्सची पूजा होऊन दिवाळी साजरी होते. विविध न्यूजपेपर्समधल्या विविध विषयांवरील कात्रणांचा संग्रह दिलीपने केला. विषयांचं वैविध्य पाहिलं तर आपले डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.

आई मंदाबाईंना भजनाचा छंद. वडील वसंतरावांना वृत्तपत्र वाचण्याची सवय. मोठा भाऊ दिनेश नियमित भगवद्गीता वाचतात. तर वहिनी वेदिका यांच्या नियमित वाचनात ग्रामगीता असते. परी आणि आयुष हे दिलीपचे पुतणी, पुतण्या. वाचनाची आवड असणाऱ्या परिवारातच दिलीप लहानचा मोठा झाला. त्यामुळे स्वाभाविकतः वाचन त्याच्या रक्तातच उतरलं.

शाळेत मूल्यशिक्षणाचे पाठ व्हायचे. त्यामुळे वाचनाची गोडी वाढत गेली. वाचता वाचता त्याला न्यूजपेपर्समधील फोटोदेखील आकर्षित करायला लागलेत. काही विषय त्याला खूप आवडायला लागलेत. ते संग्रही असावेत, असं त्याला वाटायला लागलं. जे आवडलं, ते कापून एका वहीत चिकटवून ठेवायला त्याने सुरुवात केली.

अनेक विषयांची सरमिसळ एकाच कात्रणवहीत झाली. त्याच्या डोक्यात मग एक भन्नाट कल्पना आली. त्याने विषयांचं वर्गीकरण केलं. इतिहास, राजकारण, देश-विदेश, अध्यात्म, विज्ञान, कला, क्रीडा, महामानव, प्रसिद्ध व्यक्ती, जनरल नॉलेज या प्रमाणे त्याने त्याच्या कात्रणवह्या तयार केल्यात.

दिलीपला मुळातच निटनेटकेपणाची सवय. या सर्व कात्रणांचं त्याने वेगवेगळ्या खंडांत विभाजन केलं. पुस्तकांना असते, तशी अनुक्रमणिका लिहिली. आकर्षक असं मुखपृष्ठाचं कोलाज स्वतःच तयार केलं.

जवळपास ३० खंडांमध्ये ३० हजार कात्रणांचा संग्रह दिलीपने तयार केला.

जवळच्या गावातील बाईंडरकडून ते नीट बांधून घेतलं नि त्याचा ‘ग्रंथ’ तयार झाला. एवढे सगळे वर्तमानपत्र खरेदी करणं हा त्याच्या परिस्थितीला पेलवण्यासारखं नाही. त्याने ज्याच्याकडून मिळतील त्याच्याकडून ते गोळा करायला सुरुवात केली.

पुस्तकवाचनाचा छंदही त्याने असाच जोपासला. त्याचा छंद अख्ख्या गावालाच काय, तर पंचक्रोशीतही माहीत आहे. त्यामुळे सगळेच त्याला दिलखुलासपणे सपोर्ट करायला लागलेत. बघता बघता त्याने गोळा केलेल्या कात्रणांचे 30 खंड झालेत. पानंच मोजायची म्हटलीत तर ती 10 हजार 478 इतकी होतात. त्याचं काम अजूनही सुरुच आहे.

या खंडांना दिलीपने साजेशी टायटल्सही दिलीत. ती नावं आणि कंसात पृष्ठसंख्या पुढील प्रमाणे आहेत. जागतिक ज्ञान खंड 1 (पृ.513), जागतिक ज्ञान खंड 2 (पृ. 377) जागतिक ज्ञान खंड 3 (पृ.687), तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पृ.887), अध्यात्म खंड 1 (पृ.277), अध्यात्म खंड 2 (पृ. 311), अध्यात्म खंड 3 (पृ.280), राजकारण, खेळ आणि बोधकथांचा संग्रह ‘त्रिदल’ (पृ.350), तुमचीच तुमच्यासाठी,

कवितांचं कलेक्शन तीन खंड अनुक्रमे पृष्ठ 611, 580, 733, बाळासाहेब ठाकरे यांची कात्रणं ‘भगवे वादळ’ (पृ. 263), भारतीय इतिहास (पृ. 200), विश्व इतिहास (पृ.160), प्रसिद्ध व्यक्ती खंड 1(पृ.355), प्रेरणा व शोध खंड 1 (पृ.275), प्रेरणा व शोध खंड 3(पृ.477), जवळपास 2,500 जनरल नॉलेजच्या प्रश्नांचा संच प्रश्नकुंभ, स्पर्धापरीक्षा स्पेशल (पृ.370), ‘तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी’ दुसऱ्या खंडाचे काम सुरू आहे.

त्याच्या घरातल्या देव्हाऱ्यात काही पिढ्यांपासूनचे 7 क्वॉईन्स होते. या नाण्यांनी त्याला आकर्षित केलं. त्याला शिक्के गोळा करण्याचा नवा छंद जडला. आपल्या घरात जसे जुने क्वॉईन्स आहेत, तसेच इतरांच्याही घरी ते असतील याची त्याला गॅरंटी होती. दिलीपने मग क्वाईन्स गोळा करण्याचं मिशनच सुरू केलं. गावातले, नात्यातले, दोस्त, परिचित ज्यांच्याकडून जमतील त्यांच्याकडून त्याने नाणे गोळा करायला सुरुवात केली.

दिलीपचा जनसंपर्कही खूप मोठा आहे. अनेक ठिकाणी त्याचे चाहते आहेत. त्यांचीही त्याला खूप मदत झाली. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून बरेचजण घरी परतलेत. त्यांना दिलीपचा शौक माहीत होता. त्यांनीदेखील त्याच्यासाठी असतील, नसतील तेवढे क्वॉईन्स आणलेत. त्याचे काही दोस्त विदेशातही आहेत. त्यांनीही त्याला क्वाईन्स पाठवलेत.

देवघरातल्या 7 क्वॉईन्सपासून दिलीपने सुरुवात केली. आज त्याच्याजवळ जवळपास 151देशांतले क्वॉईन्स आहेत. ती संख्या जवळपास 2,500च्या घरात आहे. खडकू, आणा, मोहर, भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशी अनेकविध नाणी त्याच्या कलेक्शनमध्ये आहेत.

प्रत्येक क्वाईन चलनात येतो. काही काळ जाता त्यात बदलही होतो. त्याच्या नवनव्या एडिशन्स निघतात. कालांतराने ते क्वाईन चलनातून बादही होतं. स्वातंत्र्यानंतरचे जवळपास सगळेच भारतीय क्वॉईन्स त्याच्याजवळ असल्याचं दिलीप सांगतो. त्याच्या सगळ्या व्हेरायटीजही त्याच्याकडे आहेत. दिलीपकडे 1 रूपयाच्या क्वॉईन्सचे 33 प्रकार आहेत.

2 रूपयाच्या क्वॉईन्सचे 23 प्रकार आहेत. 5 रूपयाच्या क्वॉईन्सचे 55 प्रकार आहेत. 10 रूपयाच्या क्वॉईन्सचे 15 प्रकार आहेत. 50 पैश्यांच्या क्वॉईन्सचे 20 प्रकार आहेत. 20 पैश्यांच्या क्वॉईन्सचे 6 प्रकार आहेत. 10 पैश्यांच्या क्वॉईन्सचे 12 प्रकार आहेत. 5 पैश्यांच्या क्वॉईन्सचे 10 प्रकार आहेत. 25 पैश्यांच्या क्वॉईन्सचे 20 प्रकार आहेत. ब्रिटीशकाळातले 70 ते 80 क्वाईन्स त्याच्या संग्रहात आहेत.

एवढंच नव्हे तर 450 वर्ष जुने मुगलकालीन, अकबर, शिंदे, गायकवाड, होळकर, पेशवे यांच्या राजवटीतलेही अनेक क्वाईन्स दिलीपच्या कलेक्शनची शान वाढवतात. 5 पैसे, 10 पैसे आणि 50 पैश्यांचे आतापर्यंत आलेले सगळे क्वाईन्स दिलीपकडे आहेत.
जगातील १५१ देशातील नाणी खालील प्रमाणे :
(१) आँस्टेलिया : नाणी १, (२) अँगोला : नाणी १ (३) आँस्टिया : नाणी १ (४) अर्जेंटिना : नाणी २ (५) अँडोरा : नाणी १  (६) भूतान : नाणी २ (७) बेल्जियम : नाणी २ (८) बांग्लादेश : नाणी १ (९) बाहरेन : नाणी १ (१०) बेलिझ : नाणी १ (११) बोटास्वाना : नाणी १ (१२) बहामा : नाणी १ (१३) बुरूंडी : नाणी १ (१४) बल्गेरिया : नाणी १ (१५) बार्बाडोस : नाणी १ (१६) चीन : नाणी ३ (१७) कँनडा : नाणी २ (१८) सायप्रस : नाणी २ (१९) चेकोस्लोव्हाकिया : नाणी २ (२०) कंबोडिया : नाणी १ (२१) मध्य आफ्रिका प्र. : नाणी १ (२२) कोलंबिया : नाणी १ (२३) क्रोएशिया : नाणी १ (२४) कोस्टा रिका : नाणी १ (२५) चिली : नाणी १ (२६) डे. रि. काँगो : नाणी १ (२७) चेक गणराज्य : नाणी १ (२८) डेन्मार्क : नाणी २ (२९) इस्टोनिया : नाणी १ (३०) इरिट्रीया : नाणी १ (३१) स्वाझीलँड : नाणी १ (३२) फ्रान्स : नाणी ४ (३३) फ्रेंच इंडोचायना : नाणी १ (३४) फिनलँड : नाणी १ (३५) फिजी : नाणी १ (३६) जर्मनी : नाणी ६ (३७) ग्रीस : नाणी २ (३८) झाम्बिया : नाणी १ (३९) जिब्राल्टर : नाणी १ (४०) ग्वेर्नसे : नाणी १ (४१)गिनी : नाणी १ (४२) जाँर्जिया : नाणी १ (४३) घाना : नाणी २ (४४) गयाना : नाणी १ (४५) हाँगकाँग : नाणी ३ (४६) हैती : नाणी १ (४६) हैती : नाणी १ (४७) हंगेरी : नाणी १ (४८) इजिप्त : नाणी १ (४९) इंडोनेशिया: नाणी ४ (५०) इटली : नाणी २ (५१) मन ची बेटे : नाणी १ (५२) इराक : नाणी १ (५३) जपान : नाणी १ (५४) जाँईन : नाणी १ (५५) जमैका : नाणी १ (५६) जर्सी : नाणी १ (५७) किरगिझस्थान : नाणी १ (५८) कुवैत : नाणी १ (५९) कझाकस्तान : नाणी १ (६०) किरिबाती : नाणी १ (६१) केनिया : नाणी १ (६२) लेबनॉन : नाणी १ (६३)लँटाव्हिया : नाणी १ (६४) मॉरिशस : नाणी ३ (६५) मलाया ब्रिटिश बेनिओ : नाणी १ (६६) मलेशिया: नाणी ३ (६७) मोरोक्को : नाणी १ (६८) मालावी : नाणी १ (६९) मेक्सिको : नाणी १ (७०) मालदीव : नाणी १ (७१) मोझाम्बिक : नाणी २ (७२) माकाउ : नाणी १ (७३) माँरिटॅनिया : नाणी १ (७३) माँरिटॅनिया : नाणी १ (७४) मादागास्कर : नाणी १ (७५) माल्टा : नाणी १ (७६) नेपाळ: नाणी ६ (७७) नेदरलँड्स : नाणी ३ (७८) मॅसिडोनिया : नाणी १ (७९) निकारागुआ : नाणी १ (८०) न्यूझीलँड : नाणी १ (८१) नाँर्वे : नाणी १ (८२) न्यू कॅलेडोनिया: नाणी १ (८३) मस्कँट आणि ओमान : नाणी २ (८४) ओमान : नाणी ४ (८५) पोलंड : नाणी ६ (८६) फिलिपीन्स : नाणी ३ (८७) पेरू : नाणी १ (८८) पाकिस्तान : नाणी १ (८९) पपुआ न्यू गिनी : नाणी १ (९०) पँराग्वे : नाणी १ (९१) कतार : नाणी १ (९२) रवांडा : नाणी १ (९३) रूमानिया : नाणी १ (९४) दक्षिण आफ्रिका : नाणी (९५) सोलोमन बेटे : नाणी १ (९६) स्लोव्हाकिया: नाणी १ (९७) स्विव्झलँड : नाणी १ (९८) स्वीडन : नाणी १ (९९) दक्षिण कोरिया : नाणी १ (१००) सिएरा लिओन : नाणी १ (१०१) सँमांआ : नाणी १ (१०२) सुरीनाम : नाणी १ (१०३) सौथ व्हिएतनाम : नाणी १ (१०४) स्पेन: नाणी ४ (१०५) सौदी अरेबिया: नाणी ३ (१०६) श्रीलंका : नाणी ७ (१०७) सोविएत उणीव : नाणी ३ (१०८) सिंगापोर : नाणी ४ (१०९) टर्की : नाणी २ (११०) थायलंड : नाणी ६ (१११) ट्रान्सनिस्टिया : नाणी १ (११२) त्रिनिदाद व टोबँगो : नाणी १  (११३) तुर्कमेनिस्तान : नाणी १ (११४) टांझानिया : नाणी १ (११५) अमेरिका: नाणी ४ (११६) उझबेकिस्तान : नाणी २ (११७) युनायटेड किंग्डम : नाणी ७  (११८) युनायटेड अरब एमिरेट्स : नाणी ३ (११९) युगांडा : नाणी १ (१२०) उरूग्वे : नाणी २ (१२१) युक्रेन : नाणी १ (१२२) व्हेनेझुएला : नाणी १ (१२३) झैर नाणी १ (१२४) रशिया : नाणी १ (१२५) पोर्तुगाल : नाणी १ (१२६) पनाया : नाणी १ (१२७) सुदान : नाणी १ (१२७) सुदान : नाणी १ (१२८) उत्तर कोरिया : नाणी १ (१२९) ब्राझील : नाणी १ (१३०) अफगाणिस्तान : नाणी १ (१३१) अल्बेनिया : नाणी १ (१३२) आल्जिरिया: नाणी १ (१३३) बेनिन : नाणी १ : (१३४) कॅमरून : नाणी २ (१३५) नायजेरिया: नाणी १ (१३६) म्यामार : नाणी १ (१३७) नामिबिया: नाणी १ (१३८) मंगोलिया : नाणी १ (१३९) पुर्व तिमोर : नाणी १ (१४०) युरोप : नाणी १ (१४१) क्युबा : नाणी १ (१४२) लाओस : नाणी १ (१४३) आइसलँड : नाणी १ (१४४) आयलँड : नाणी १ (१४५) झिम्बाब्वे : नाणी १ (१४६) व्हिएतनाम : नाणी १ (१४७) ग्रीनलँड : नाणी १ (१४८) सिरिया : नाणी १ (१४९) टोकेलाँ : नाणी १ (१५०) टोंगा : नाणी १ (१५१) आपला देश म्हणजे भारत १ हजार ५०० च्या वर ऐतिहासिक नाणी …

केवळ बारावीपर्यंत शिकलेल्या दिलीप वसंतराव महात्मे नामक युवकाची धडपड अजूनही सुरूच आहे. तो खेड्यात राहतो. शेतमजुरी करतो. छोट्या छोट्या गोष्टीदेखील लोक सोशल मीडियावर शेअर करतात. दिलीपला ते जमलं नाही. मातीच्या ढिगाऱ्यातच जणू त्याचं हे ‘वैभव’ झाकोळलं आहे.

हे सगळं ज्ञानाचं भंडार सर्वांपर्यंत पोहचावं. विशेषतः विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळावी ही दिलीपची इच्छा आहे. यासाठी तो मोबदल्याची विशेष अपेक्षाही ठेवत नाही, हे विशेष. ज्या गावात साधी बसही जात नाही, त्या गावात त्याने संपूर्ण जगातलं भांडार आणलं. हे त्याचं कलेक्शन प्रदर्शनींच्या माध्यमातून जगभर जावं, हीच त्याची प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्या कार्याला सदिच्छा.

हे सर्वांपर्यंत पोहचलं पाहिजे

नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे. त्यांनी वर्तमानपत्रं वाचावीत. जगभरातल्या संस्कृतीचा, इतिहासाचा, वैशिष्ट्यांचा अभ्यास करावा. वर्तमानपत्रांतील कात्रणांचा माझा संग्रह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पाहावा. शाळा, कॉलेजसह, विविध मंडळं, संस्थांनी ही प्रदर्शनी आयोजित करावी.

मला मानधनाची फारशी अपेक्षा नाही. प्रदर्शनासाठी जो काही किरकोळ खर्च लागेल, तो मिळाला तरी पुरे. हे सगळं वैभव सर्वांपर्यंत पोहचलं पाहिजे, हीच अपेक्षा. मला हे कॉईन्स आणि त्यांची माहिती अत्याधुनिक पद्धतीने जतन करायची आहे. प्रदर्शनीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचवायची आहे.

मी साधा शेतमजूर आहे. शिक्षणही पूर्ण करू शकलो नाही. तरी ज्ञानाची ओढ आहे. ही ज्ञानाची लालसा सर्वांमध्येच निर्माण व्हावी, म्हणून माझी ही धडपड. साधं पोस्ट ऑफीसही नसलेल्या एका दूरच्या खेड्यात मी राहतो. माझ्यापर्यंत सर्वांनाच पोहचणं शक्य नाही. माझं हे वैभव सर्वांना पाहता यावं, हीच अपेक्षा आहे.

दिलीप वसंतराव महात्मे
मु. पेठ रघुनाथपूर, पो. मंगरूळ दस्तगीर,
ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती 444711
मोबाईल – 9356996353, 9529620939
[email protected]

तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी संपूर्ण विश्वाला प्रेरणा दिली. देत आहे. दिलीपही या विचारांनी प्रेरित झाला. या महामानवांवर न्यूजपेपरमध्ये आलेले लेख, बातम्या, त्यांचे सुविचार यांचा संग्रह करणे त्याने सुरू केलं.

या कलेक्शनचा 887 पानांचा पहिला खंड त्याने तयार केला. ‘तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी’ असं छानसं टायटलही दिलं. यात एकूण 304 लेख, 2,500 फोटो, 550 सुविचार आणि 60 कविता आहेत. जगभरातील विहार, स्तूप आणि स्मारकांचाही यात समावेश आहे.

हे सर्वांपर्यंत पोहचावं यासाठी तो प्रयत्न करीत आहे. दिलीपने पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रीसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेसोबत त्यासाठी पत्रव्यवहारही केला. अनेक मान्यवरांना त्याचा संग्रही दाखवला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात प्रकाशित झालेल्या बातम्या आणि लेखांचाही संग्रह दिलीपने केला. ‘भगवे वादळ’ असं समर्पक शीर्षकही दिलं. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी ही बाब काही वर्षांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवली. अनेक आमदार, खासदार, मंत्री, राजकारण आणि समाजकारणातल्या बड्या हस्ती या सर्वांपर्यंत दिलीपने आपला विषय मांडला.

हेदेखील वाचा

स्पर्धेला घाबरला तो, तरीही जिंकला लढाई….

हेदेखील वाचा

रस्ता चुकला अन् रायफल गवसली…

 

Leave A Reply

Your email address will not be published.