निर्गुडा नदीपात्रात घाणीचे साम्राज, डुकरांचा मुक्त संचार

युवासेनेतर्फे प्रशासनाला निवेदन, दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा

0

जब्बार चीनी, वणी: वणीची जीवनदायिनी निर्गुडा नदी सध्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याची गटरगंगा झाली आहे. नदीच्या पात्रात कचरा साचून तिथे डुकरांचा मुक्त संचार सुरू आहे. याबाबत शिवसेना प्रणित युवासेनेतर्फे निवेदन देण्यात आले असून नदीच्या पात्राची लवकरात लवकर साफसफाई न केल्यास मोठे आंदोलन उभे करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक गाव व शहरातील नद्या स्वच्छ करण्यात आल्या. मात्र या काळात आपले प्रशासन झोपले होते असा आरोप ही युवासेने तर्फे करण्यात आला आहे.

निर्गुडा नदी हा विषय प्रत्येक वणीकरांच्या जिव्हाळ्याचा व भावनिक विषय आहे. कधीकाळी बारमाही वाहणारी निर्गुडा नदीची अलिकडच्या काही वर्षात चांगलीच दुर्दशा झाली होती. नदी पात्रात प्रचंड कचरा व गाळ साचून नदीचं सारं सौंदर्यच नष्ट होऊन त्याचा नाला झाला होता. मध्यंतरीच्या काळात नदी स्वच्छता अभियान चालले. त्याद्वारे नदी स्वच्छ करून नदीचे पात्र मोठे करण्यात आले. पण अभियान संपल्यानंतर मात्र नदीची दरवर्षी देखभाल करण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी नदीची अवस्था बिकट झाली आहे.

निवेदनात म्हटले आहे की सध्या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. वणी आणि गणेशपूरला जोडणा-या पुलाच्या खाली डुकरांचा मुक्त संचार असतो. या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचाही कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. राज्यामध्ये प्लास्टीकच्या पिशव्यांना बंदी असतानाही प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा नदीपात्रात कसा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी नदीचे खोलीकरण करण्यात आले. पण नदीच्या तळाशी असलेला गाळ मात्र यावेळी काढण्यात आला नाही. त्यामुळे या गाळामध्ये डुकरांचा मुक्त संचार सुरू आहे. हीच नदी पुढे वाहत जाते त्यामुळे हेच दुषीत पाणी पुढे जाते. याशिवाय परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे साथीच्या आजारांचा धोका सुद्धा नाकारता येत नाही.

निवेदन देताना युवासेना कार्यकर्ते

नदीची विटंबना सहन केली जाणार नाही – विक्रांत चचडा
नदीला आपल्या भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचे स्थान आहे. नदीला माता आणि देवीचा दर्जा आपल्याकडे दिला जातो. निर्गुडा नदी रही केवळ जीवनदायिनीच नाही तर सर्वसामान्य वणीकरांच्या भावना या नदीशी जुळलेल्या आहेत. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नदी अस्वच्छ झाली आहे. अस्वच्छ झाल्याने इथे डुकरांचा संचार सुरू आहे. ही नदीची विटंबनाच आहे. जीवनदायिनीची अशी विटंबना सहन केली जाणार नाही. लॉकडाऊनमुळे लागलेल्या संचारबंदीच्या काळात अनेक शहरातील नद्या स्वच्छ करण्यात आल्या. मात्र या काळात आपले लोकप्रतिनिधी झोपले होते.
– विक्रांत चचडा, जिल्हा प्रमुख युवा सेना

याबाबत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. जर नदीची लवकरात लवकर स्वच्छता केली गेली नाही तर मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. याआधीही रस्त्यावरील गड्ड्याबाबतही युवासेनेने ‘गड्डे रंगवा’ हे अभिनव आंदोलन केले होते. मात्र रस्त्यावरील गड्डे अद्यापही बुजवले न गेल्याबाबत युवासेनेने संताप व्यक्त केला गेला आहे. निवेदन देते वेळी विक्रांत चचडा यांच्यासह सौरभ खडसे, ललित जुनेजा, अनुप चटप, शुभम मदान, कुणाल लोनारे यांच्यासह युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.