नगर पंचायतीने आणली ‘गोटा’ शोधण्याची वेळ

शौचालय दिले पण पाण्याची सोय नाही, नगरपंचायतीचा 'भोंगळ' कारभार

0

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या प्रसाधनगृहाची स्वछते अभावी आणि पुरेसे नियोजन नसल्याने वाट लागली आहे. येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी प्रसाधन गृहाच्या परिसरातील दुकानदारांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे इथे शौचालय दिले, पाण्यासाठी बोअर दिली, पण लाईट न दिल्याने इथे पाणी नाही. त्यामुळे नगर पंचायतीने लोकांवर जाण्याआधी ‘गोटा’ शोधण्याची वेळ आणल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांना पर्याय नसल्याने या प्रसाधन गृहाचा वापर करावा लागतो. त्यामुळे तिथे जाणा-या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

वर्षभरापूर्वी प्रवाशांच्या व शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी बसस्थानक परिसरात प्रसाधन गृहाची निर्मिती करण्यात आली. मात्र या प्रसाधनगृहाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने इथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथे पाण्याची सुविधा नसल्याने इथले शौचालय केवळ ‘शोभेची वास्तू’ बनली आहे. 

नगरपालिकेचा भोंगळ कारभार
प्रसाधनगृहात शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी लागणा-या पाण्यासाठी बोअरवर मोटर पंप लावण्यात आला आहे. मात्र येथे नगर पंचायतीने वीज उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे लाखो रूपये खर्च करून मारण्यात आलेली बोअर धूळ खात आहे.

हे प्रसाधनगृह बसस्थानक परिसरात असल्याने त्याचा वापर प्रवाशांसह परिसरातील व्यावसायिक तसेच इतर लोकही करतात. मात्र नगर पंचायतीद्वारा या प्रसाधनगृहाचा कोणताही मेन्टनन्स होत नसल्याने ही जागा वापरण्यासाठी योग्य नाही. अनेकांना पर्याय नसल्याने या प्रसाधन गृहाचा वापर करावा लागतो. जर उद्या कुणी बसस्थानक परिसरात ‘गोटा’ शोधताना दिसल्यास नवल वाटायला नको…

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.