झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया व खतांचे वाटप करा
● तालुका युवक काँग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन
सुशील ओझा, झरी: संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांची कापूस तूर सोयाबिन व इतर पिकांची पेरणी होऊन झाली आहे. पिके सुद्धा उभे झाले आहेत. परंतु पिकाकरिता युरिया व खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे झरी युवक काँग्रेसच्या वतीने युरिया व खतांचा तात्काळ पुरवठा करावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे. जर युरिया वाटप न केल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
जिल्ह्याकरिता शासनाकडून ३२ हजार मेट्रिक टन युरियाची मागणी करण्यात आली होती, परंतु १८ हजार मेट्रिक टन युरिया जुलै महिन्यापर्यंत उपलब्ध झाला. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा होत नसून ७ ते ८ दिवसात अडीच हजार मेट्रिक टन युरिया इतर तालुक्यात वळता केला. ज्यामुळे हा युरिया शेतकऱ्यांकरिता तुटपुंजा असल्याची तक्रार केली आहे.
तालुका पातळीवर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना खत पोहचविले जात आहे त्या ठिकाणी खत घेण्याकरिता शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहे. देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना युरिया व खता करिता उपाशीपोटी रांगेत उभे रहावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. देशात आधीच कोरोना सारख्या महामारीचा सामना करीत सोशल डिस्टन्स पाळण्याचे आदेश असताना शेतकऱ्यांना डिस्टनसिंग ची पायमल्ली करीत रांगेत उभे रहावे लागत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया व इतर खतांचा त्वरित वाटप करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बुरेवार, कृ उ बाजार समिती संचालक निलेश येल्टीवार, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष राहुल दांडेकर,सचिन टाले, राकेश गालेवार, चेतन म्याकलवार, शंकर आकुलवार सह कार्यकर्त्यांनी केली आहे.