मारेगाव येथील कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण गेला पळून

पुरके आश्रम शाळेत होता आयसोलेट, परिसरात एकच खळबळ

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील पुरके आश्रम शाळेत अलगीकरण (आयसोलेशन) कक्षात असलेली व  तिथे उपचार सुरू असलेली कोरोना पॉजिटिव्ह व्यक्ती चक्क पळून गेल्याचा धक्कादायक आणि तितकाच गंभीर प्रकार आज बुधवारी दिनांक 29 जुलैच्या सकाळी उघडकीस आला. ही व्यक्ती कुंभा येथील असून राजुर (कॉलरी) येथील रुग्णाच्या साखळीतील आहेत.

दिनांक 25 जुलै रोजी कुंभा येथील एक 40 वर्षीय पुरुष पॉजिटिव्ह आढळला होता. जिल्हाधिकारी यांनी सध्या कोरोनाचे लक्षणं नसलेल्या किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना स्थानिक पातळीवरच उपचार करण्याचे व आयसोलेट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कुंभा येथील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं असल्याने त्याला मारेगाव येथील पुरके आश्रम शाळेत उभारलेल्या कोविड केअर सेन्टरमध्ये अलगीकरण (आयसोलेशन) कक्षात ठेवण्यात आले होते.

दरम्यान तिथल्या कर्मचा-यांनी आज सकाळी कुंभा येथील रुग्ण आयसोलेशन कक्षात आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी शोध घेतला असता तो सेन्टरमध्ये कुठेही दिसला नाही. कर्माचारी व गार्डने याबाबत लगेच वरिष्ठांना माहिती दिली. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी तात्काळ क्वारन्टाईन सेन्टर गाठले. सदर रुग्ण हा पहाटे 4.30 ते 5 वाजताच्या दरम्यान पळून गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्या मारेगाव येथील पुरके आश्रम शाळेतील कॉरन्टाईन सेन्टरमध्ये 36 व्यक्ती कॉरन्टाईन आहेत. यात कुंभा येथील 27 व्यक्ती, नवरगाव येथील 3 व्यक्ती तर पहापळ येथील 6 व्यक्तींचा समावेश आहे. या 36 व्यक्तींपैकी राजूर व कुंभा येथील रुग्णांच्या संपर्कात आल्याने कुंभा येथील 27 व्यक्ती तर तेलीफैलातील अंतयात्रेत सहभागी झालेली व्यक्ती पॉजिटिव्ह निघाल्याने नवरगाव येथील 3 व पहापळ येथील 6 अशा एकूण 9 व्यक्तींना कॉरन्टाईन करण्यात आले आहेत. यातील एक व्यक्ती जी आयसोलेट होती ती फरार झाली आहे. कालच मारेगाव येथे स्वॅब एकाचे घेऊन त्यावर नाव दुस-याचे टाकल्याचा प्रकार उघडकीस आला होता हे विशेष. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मारेगाव येथील दुसरी घटना
याआधीही दोन महिन्याआधी लॉकडाऊनच्या काळात गोंडबुरांडा येथील शाळेत कॉरन्टाईन असलेला गोंडबुरांडा येथील एक तरुण तिथून पळून गेला होता. पळून गेल्याच्या चार दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाने केवळ परिसरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. ही पार्श्वभूमी असतानाच आता चक्क कोरोनाचा एक रुग्णच पळून गेला आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ व डॉ. अर्चना देठे (तालुका वैधकीय अधिकारी मारेगाव) यांची प्रतिक्रिया…

 

Leave A Reply

Your email address will not be published.