वणीमध्ये रात्री उशिरापर्यंत वाजला लाऊड स्पीकर

तक्रार करूनही पोलीस विभागास कार्यवाहीचा विसर

0

विवेक तोटेवार, वणी: सध्या लग्नाचा सिजन सुरू असल्याने वाद्य व डी जे वाजविणे हे नित्याचेच होऊन बसले आहे. न्यायालायच्या निर्देशानुसार रात्री 10 नंतर डीजे किंवा लाऊड स्पिकर वाजवण्यास बंदी आणण्यात आलेली आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून वणीमध्ये रात्री 11.30 पर्यंत एका लग्न समारंभात संगीत पार्टी सुरू होती. हा प्रकाराबाबत काही लोकांनी पोलीस विभागाला माहितीही दिली मात्र प्रशासनानं यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.

वणीमध्ये 10 डिसेंबर रविवारला वसंत जिनिगमध्ये एक लग्नामध्ये गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री 10 नंतरही हा कार्यक्रम पूर्ण आवाजात सूरू होता. काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत ठाणेदार व पोलीस ठाण्यात फोन करून याबाबत तक्रारही केली. पण या प्रकाराकडे पोलिसांनी संपूर्ण दुर्लक्ष केले. प्राप्त माहितीनुसार हा कार्यक्रम रात्री 11.30 पर्यंत सुरू होता.

प्राप्त माहितीनुसार या लग्न समारंभात वरोरा येथील सुगम संगीताचा कार्यक्रम करणारी चमू आली होती. या लग्न समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी वणीतील राजकीय नेते व वरोरा येथील नेते उपस्थित होते. लग्नात राजकीय पुढारी असल्याने आपणास कोण काय करणार? असा तोरा मिरवत कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांची उपस्थित असल्याने पोलिसांनी कार्यवाही केली नसल्याचे बोलले जात आहे. तसंच नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच का असा प्रश्न वणीकर जनतेद्वारे उपस्थित केल्या जात आहे.

नियम काय सांगतो ?
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शहरात व वस्तीच्या ठिकाणी 55 डेसीमल पेक्षा अधिक आवाज नसावा. तर रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कोणत्याही प्रकारची वाद्ये तसेच फटाके फोडण्यास बंदी आहे. याबाबत नियम तोडणा-यांवर पर्यावरण रक्षणाचा कायदा 1986 व ध्वनिप्रदूषण अधिनियम 2000 लागू करण्यात आला आहे. यानुसार नियमाचे उल्लंघन केल्यास कलम 15 प्रमाणे 5 वर्षे कैदेची किंवा 1 लाख रुपये दंडाची किंवा दोन्हीची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षा झाल्यानंतर एक वर्षाच्या काळात पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास सदर गुन्हा दखलपात्र, अजामीनपात्र व प्रथम वर्ग न्यायालयाकडे चालणार अशी तरतूद करण्यात आली आहे.

वणीमध्ये रविवारी एका लग्न समारंभात हे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. कार्यक्रमात राजकीय क्षेत्रातील पुढारी असल्याने पोलिसांनी उदासिन भूमिका बजावली असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या कार्यक्रमात रात्री 10 नंतर 5-10 मिनिट जरी वाद्य वाजले तर त्यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उगारला जातो. मग या ठिकाणी पोलिसांनी सुट का दिली असा प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत आहे. आता यांच्यावर कार्यवाही होणार की हे प्रकरण दाबले जाणार याकडे वणीकर जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.