वेकोलीच्या धुळीने शेतकऱ्यांचं पांढर सोनं झालं काळं

मुंगोली परिसरात वेकोलीची मनमानी

0

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील मुंगोली कोळसा खाण प्रशासनाने खाणीत ड्रॅगलाईन मशीन साठी वापरण्यात येणाऱ्या ब्लॅस्टिंगमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील पांढर सोन आता वेकोलीच्या मनमानीने काळेभोर झाले आहे. या नुकसानीची भरपाई वेलोकीने त्वरित देण्याची मागणी मुंगोलीचे सरपंच रुपेश ठाकरे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली असून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

वणी तालुक्यातील मुंगोली येथे कोळशाची भूमिगत खाण आहे. शेतकऱ्यांची कसलेली जमीन अधिग्रहित करून तुटपुंजा मोबदला देत वेकोलीने उत्खनन केले आहे. मात्र मुंगोली परिसरातील समस्या अद्यापही कायमच आहे. एकीकडे पुनर्वसन,दुसरीकडे शेतकरी पुत्रांना रोजगार अद्याप हव्या त्या प्रमाणात उपलब्ध करून दिलाच नाही. सत्तेत येण्याआधी सध्याच्या मंत्र्यांनी वारंवार आंदोलन भेटी गाठी घेत वेकोलीचा मुद्दा रेटला होता. मात्र आतातर जणू पाठच फिरविली असल्याचा आरोप वेकोलिग्रस्त शेतकरी करीत आहेत.

या समस्यांबाबत मुंगोलीचे सरपंच रुपेश ठाकरे यांनी वारंवार निवेदने तक्रारी केल्या आहेत. परंतु वेकोली व लोकप्रतिनिधीनी अद्याप कोणताही तोडगा काढला नाही हेच खरे दुःख आहे. साड्या परिसरातील कोळसा खाणीमध्ये ड्रॅगलाईन ने ब्लास्टिंग करून कोळसा काढण्यात येत आहे. या ब्लास्टिंग मधून निघणारी धूळ परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकात जात आहे. त्यामुळे शेतात दिवसरात्र कष्ट उपसून पिकविलेलं पांढर सोन आता वेकोली काळे करायला निघाली आहे.

एकीकडे शासनाची वक्रदृष्टी त्यात वेकोलीची मनमानी यातच शेतकरी पुरता भाजला गेला आहे. कोळशाच्या धुळीने तुरीचा बहार करपून गेला तर कापूस मात्र काळा कुट्ट झाला आहे. परिणामी कसाबसा काढलेल्या काळ्या कापसाला बाजारपेठेत भाव पण मिळत नाही अशी अवस्था येथील शेतकऱ्यांची झाली आहे. वेकोलीच्या ब्लॅस्टिंगमुळे मुंगोली,शिवणी गावाला चांगलेच हादरे बसत आहे. या हादऱ्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे. कोळशाच्या धुळीने पिकासह मानवी आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे. चोहोबाजूने परिसरातील शेतकऱ्यांना कोंडीत पकडल्याने वेकोलिग्रस्त शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

वेकोलीच्या धुळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचा पाहणी अहवाल तयार करून योग्य मोबदला देण्याची मागणी मुंगोलीचे सरपंच रुपेश ठाकरे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. सोबतच ब्लास्टिंगबाबत व वेकोलीच्या मनमानी कारभारा बाबत प्रशासनाने उपाययोजना करून शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय देण्याची मागणी सुद्धा केली आहे. जर यावर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करणार असू न कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.