जम्बो पक्षप्रवेशाने कॉंग्रेसच्या कमकुवत नेतृत्वाला मिळणार का बळकटी ?
डॉ. लोढा यांचा हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.. पक्ष प्रवेश कार्यक्रमात कोरोनाचे नियम धाब्यावर
जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचा हजारो कार्यकर्त्यांसह सोमवारी कॉंग्रेस पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. स्थानीय वसंत जिनिंग लॉनवरील आयोजित कार्यक्रमात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या हजारों कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या काही मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीला रामराम करून कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
वणी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे काँग्रेसमध्ये प्रवेशामुळे काँग्रेसला चांगली बळकटी मिळाली आहे. मात्र कॉंग्रेसचे स्थानिक नेतृत्त्व कमकुवत ठरत असल्याने या जम्बो पक्ष प्रवेशाचा पक्षाला फायदा होणार का ? याबाबत विविध मतमतांतरे दिसून येत आहे.
वामनराव कासावार यांचा विधानसभा क्षेत्रातील संपर्क तुटला ..!
विधानसभा निवडणुकीच्या गेल्या 2 टर्ममध्ये माजी आमदार वामनराव कासावार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही टर्ममध्ये भाजपने काँग्रेसवर दणदणीत विजय मिळवला. मात्र पराभव होताच वामनराव कासावार यांचा वणी विधानसभा क्षेत्रातील वावर कमी झाल्याचे दिसून येत आहे. पाच वर्ष काँग्रेस पक्ष सत्तेबाहेर होता. तसेच वामनराव कासावार हे देखील पराभूत झाल्याने विरोधी पक्षात होते. मात्र या 5 वर्षांच्या याकाळातही वामनराव कासावार यांच्याद्वारे कोणतेही मोठे आंदोलन करण्यात आले नाही. वामनराव कासावार यांचा सामान्य मतदारांपासून दूर राहणे केवळ काँग्रेससाठीच नाही तर वामनराव कासावार यांच्यासाठीही हे तोट्याचे ठरू शकते.
विधानसभा क्षेत्रात खा.बाळू धानोरकरांचे वाढतेय वर्चस्व
एकीकडे वाढत्या वयाचे मा. आमदार वामनराव कासावार यांचे वणी विधानसभा क्षेत्रात प्रभाव कमी होताना दिसत आहे. तर दुसरी कडे वरोरा येथील रहिवाशी तडफदार खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचा मोठा प्रभाव वणी विधानसभा मतदार संघावर दिसून येत आहे. स्थानिक नेतृत्त्वच कमकुवत ठरत असल्याने धडाडीचे कार्यकर्ते खा. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्त्वाकडे ओढले जात आहे. झरी, मारेगाव, वणी या तिन्ही तालुक्यात सध्या बाळू धानोरकर यांना मानणारे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाले. दुसरीकडे वामनराव कासावार यांचे जुने कार्यकर्ते मात्र अद्यापही थंड असून ते कोणत्याही उपक्रमात दिसून येत नाही.
आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका जिंकण्याचे आव्हान
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच काँग्रेसकडे मतदारांचा कल वाढला आहे. याची प्रचिती मारेगाव आणि झरी येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिसून आली. मात्र वणीत नेतृत्त्वच थंड असल्याने काँग्रेस एक कमकुवत विरोधी पक्ष ठरली आहे. वणी विधानसभा क्षेत्रात प्रदूषण, अवैध उत्खनन, जड वाहतूक, रेती चोरी, जनावर तस्करी, रस्त्यांची दुरावस्था अशी अनेक समस्या आहे. मात्र मागील पाच वर्षात कॉंग्रेस पक्षाकडून स्थानिक मुद्यांवर एकही मोठे आंदोलन करण्यात आले नाही. त्यामुळे नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता स्थापन करण्याचे मोठे आव्हान आहे.
पंख छाटणे बंद होणार का ?
वणी विधानसभा क्षेत्रात गेल्या 32 वर्षांपासून वामनराव कासावार यांच्याकडे कॉंग्रेस पक्षाचे एकहाती नेतृत्व आहे. या काळात वामनराव कासावार हे 4 वेळा आमदार राहिले आहे. मात्र 32 वर्षांचा काळ गेला असला तरी काँग्रेसमध्ये दुस-या फळीतील नेतृत्व पुढे का आले नाही हा एक संशोधनाचा विषय आहे. पक्षातील दुस-या फळीतील वर येऊ पाहणारे व डोईजड होणा-या नेत्यांचे स्थानिक नेतृत्वाकडूनच पंख छाटले जातात असा आरोप कायमच होत राहिला आहे. त्याच कारणाने अनेक नेते पक्ष सोडून गेले. याचा मोठा फटकाही पक्षाला बसला व गेली दोन टर्म काँग्रेसला ही जागा गमवावी लागली आहे.
कॉंग्रेस नेत्याना कोरोना नियमांचा पडला विसर
अभिष्ठचिंतन व पक्ष प्रवेश कार्यक्रम सोहळा आयोजित करताना सत्तेत सहभागी असलेले कॉंग्रेसचे मंत्री व नेते कोरोना नियम विसरले की काय ? मेळावे, आंदोलन, मिरवणूक यांच्यावर बंदी असताना या कार्यक्रमात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील हजारो नागरिकाना याठिकाणी जमा करण्यात आले. विशेष म्हणजे पोलिस विभागाने या कार्यक्रमाला मंजूरी देताना कोरोना नियमाची जाणीव नव्हती का ? असा ही प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
Comments are closed.