जब्बार चीनी, वणी: उपचारादरम्यान आकाश पेंदोर या रंगनाथ नगर येथील तरुणाचा मृत्यू झाला होता. मृत्यू नंतर संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी उपचार करणा-या डॉक्टरांना मारहाण करत त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केली होती. याच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी दिनांक 21 जानेवारी रोजी शहरातील सर्व दवाखाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांच्या विविध असोसिएशनतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
सोमवारी दिनांक 18 जानेवारी रोजी आकाश उर्फ विकास पेंदोर हा रंगनाथ नगर येथील तरुण तब्येत ठिक नसल्याने जत्रा रोड येथील डॉ. पद्माकर मत्ते यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून त्याला लस दिली व औषधे लिहून दिली. मात्र घरी आल्यावर त्याची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे आकाशला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉ मत्ते यांच्या दवाखान्यात धाव घेतली. तिथे त्यांनी डॉ. पद्माकर मत्ते यांना मारहाण करत त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केली होती.
डॉक्टर असोसिएशनतर्फे हल्ल्याचा निषेध
डॉक्टर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. कोरोनासारख्या काळातही डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा दिली. डॉक्टरांवर भ्याड हल्ला करणे, दवाखान्याची तोडफोड करणे ही निषेधार्ह बाब आहे, डॉ. मत्ते यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.– डॉक्टर असोसिएशन वणी
डॉ पद्माकर मत्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शहरातील सर्व दवाखाने बंद राहणार आहे, याची जनतेने नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात डॉ. शिरीष ठाकरे अध्यक्ष IMA वणी. डॉ. रमेश सपाट अध्यक्ष NIMA वणी, डॉ. किशोर कोंडावार अध्यक्ष HIMPAM वणी यांनी केले आहे.
हे देखील वाचा: