बहुगुणी डेस्क, वणी: एका 23 वर्षीय महिलेवर पती आणि सासरच्यांकडून अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण, अपत्य झाल्यावरही खाण्यापिण्याची उपेक्षा करणे असा त्रास विवाहितेला देण्यात आला. तसेच 2 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करत तिचे दागिने हिसकावू घराबाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. या प्रकरणी पती व सासरच्या मंडळींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, विवाहिता ही 23 वर्षांची असून ती वागदरा येथील रहिवासी आहे. 2021 मध्ये तिचे मुळचे उत्तरप्रदेश व सध्या माजरी येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाशी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. लग्नानंतर ती माजरी येथे पतीकडे राहत होती. तीन वर्षांनी तिला एक अपत्य देखील झाले. लग्नानंतर काही दिवस सासरच्यांनी तिला चांगली वागणूक दिली. मात्र, नंतर पतीने चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली जायची. सासरा नेहमी पतीला भडकावले, तर नणंद सोडचिठ्ठी देण्यासाठी प्रोत्साहन देत होती. या सर्वांनी मिळून शिवीगाळ आणि मारहाण केली.
27 ऑगस्ट 2024 रोजी पीडितेला अपत्य झाले. मात्र अपत्य झाल्यानंतर पती, सासरे यांनी तिच्या खाण्यापिण्याची आणि औषधांची व्यवस्था केली नाही. त्यामुळे पीडितेने तिच्या आईला फोन करून माजरी येथे बोलावले. तिच्या आईने पती आणि सासर्यांना समजावले. याबाबत दोन बैठका झाल्या. मात्र सासरच्यांनी पीडितेला घरात ठेवण्यास नकार दिला. त्यांनी दागिने हिसकावले आणि लग्नातील 2 लाख रुपये खर्च परत द्या म्हणून 9 सप्टेंबर 2024 रोजी तिला घराबाहेर काढले. तेव्हापासून विवाहिता ही माहेरी राहते. दरम्यान वर्षभरापासून तिला घेण्यास सासरचे कोणीही आले नाही.
अखेर कोणताही समेट होत नसल्याचे पाहून 1 सप्टेंबर 2025 रोजी पीडित महिलेने वणी पोलीस स्टेशन गाठत पती व सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी पती, सासरे, दिर, ननंद विरोधात बीएनएसच्या कलम 85, 352 व 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.



Comments are closed.