नगर वाचनालयाने दाखवला तरुणांना मार्ग – विजय चोरडिया

स्पर्धा परीक्षा ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगर वाचनालयातील कादंबरी, चरित्र, कथा, ऐतिहासिक पुस्तके आणि स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा विपुल साठा युवकांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी प्रभावी ठरत आहे. या ग्रंथ संपदेमुळे युवकांना स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास दानशूर सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपा नेते विजय चोरडिया यांनी व्यक्त केला. ते दिनांक 4 सप्टेंबर रोजी वणी नगर वाचनालयात आयोजित स्पर्धा परीक्षा ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू धावंजेवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

सायंकाळी फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

उद्घाटक म्हणून बोलताना विजय चोरडिया यांनी नगर वाचनालयाच्या वाचन संस्कृती टिकवण्यासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी वाचनालयात येणाऱ्या वाचकांसाठी वॉटर फिल्टर देण्याची घोषणा केली. प्रमुख अतिथी राजू धावंजेवार यांनी वाचनालयाच्या या उपक्रमाचे स्वागत करत, अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले, तर सहायक ग्रंथपाल प्रमोद लोणारे यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रदर्शनामुळे विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाचनाची आवड वाढण्यास चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments are closed.