डोंगरगाव रस्त्याच्या दुरूस्तीचं आश्वासन, उपोषण मागे

उपोषणकर्त्यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे अखेर झुकलं प्रशासन

0
वणी: गणेशपूर ते डोंगरगाव रस्त्याची दुरवस्था झाल्यानं डोंगरगाव वासियांनी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाच्या दुस-या दिवशी लोकप्रतिनिधींनी आठ दिवसात रस्त्याची दागडुजी आणि सहा महिन्यात रस्त्याचं मजबुतीकरण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं.
डोंगरगाव (दहेगाव) कडे मूर्धोनी मार्गे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तसंच मारेगाव तालुक्यातील वेगाव कडे जाणारा रस्ताही पूर्णतः उखडला आहे. परिणामी परिसरातील ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होत आहे. याविषयी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं अखेर डोंगरगाव, वेगाव येथील ग्रामस्थांनी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. आमरण उपोषणाचं हत्यार उपसताच प्रशासन दणाणलं आणि त्यांनी रस्त्याचं काम करून देण्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणा-यांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे.
डोंगरगांव येथील शंकरराव गोवारकर, गुलाब राजूरकर, मनोज झाडे, किशोर बांदूरकर, बापूजी लोणगाडगे, पांडूरंग मिलमिले, सुहास हिंगाणे, पंढरी येटी, विनोद रोगे तसंच किसान सभेचे दिलीप परचाके यांनी पुढाकार घेत प्रशासनाच्या विरूध्द एल्गार पुकारला होता. अखेर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत यांनी पुढाकार घेतला.
त्यांनी संबधीत विभागाला पाचारण करून गणेशपूर ते डोंगरगांव रस्त्याची आठ दिवसात तात्पूरती दुरूस्ती करण्याचं, तसंच सदर रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती अथवा खनिज विकासकडे पाठवून येत्या सहा महिण्यात रस्त्याचे मजबूतीकरण करण्याचं लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागं घेतलं. यावेळी आमदार बोदकुरवार, जि. प. सदस्य संघदीप भगत, जि.प. सदस्य बंडू चांदेकर, पं. स. सदस्या शिला कोडापे, रांगण्याचे सरपंच ज्योती शिंदे सह उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave A Reply

Your email address will not be published.