वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय

पाण्याचं उपकरण पडलं बंद, तर प्रसुती तज्ज्ञ डॉक्टरांचा पत्ता नाही

0

वणी: वणी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सध्या पर्णता ढेपाळला आहे. रुग्णालयात येणा-या रुग्णांना पिण्याची सोय नाही. शिवाय प्रसुतीसाठी इथं डॉक्टरांचाही पत्ता नाही. त्यामुळे रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे.ग्रामीण रुग्णालय सध्या ‘आजारी’ असताना रूग्णकल्याण समिती मात्र पुढारीपणातच गुंग असल्याचं दिसत आहे.

जिल्ह्यातील कोळसा खनिजाची खाण असलेल्या वणी परिसराचा विस्तार झपाट्याने वाढला आहे. कोळसा व इतर उद्योग असल्यानं येथे आंतरराज्यीय कामगार कामानिमित्त आले आहेत. सामान्यांना आजारपणात ग्रामीण रुग्णालयाची वाट धरावी लागते, परंतू येथील ग्रामीण रुग्णालयच सध्या सलाईनवर दिसायला लागले आहे. धड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुध्दा रुग्णालयात नाही. जुने उपकरण बंद अवस्थेत आहे. येथे येणा-या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचीही कमतरता आहे. सध्या कंत्राटी डॉक्टरांच्या मदतीनं कसंबसं कामकाज सुरू आहे.

रुग्णालयात इतर आजारांशी संबधीत डॉक्टरांची नियुक्ती नसली तरी सुंगणी तज्ज्ञ मात्र दोन आहेत. सामान्य महिलांची प्रसुती करण्यासाठी येथे स्त्री रोग तज्ज्ञ व प्रसुती तज्ज्ञ सुध्दा नाही. कठीण प्रसुतीच्या वेळी येथील डॉक्टर म्हणजेच वैद्यकीय अधिक्षक रुग्णांच्या नातेवाईकांना थेट खाजगी दवाखान्याचा सल्ला देतात, असा रुग्णांचा आरोप आहे. यावरून येथील डॉक्टरांचे खाजगी रुग्णालयांशी साटंलोटं तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय.

हेच ते बंद अवस्थेत असलेलं उपकरण

जेव्हा एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीनं फोन केला की, सर्व यंत्रणा सज्ज होते. पण सर्वसामान्यांसाठी जेव्हा अशी वेळ येते तेव्हा मात्र कोणतीही यंत्रणा कामी लागत नाही. यासोबतच कित्येक व्यवहार बनावट देयके सादर करून केल्याची कुजबुज देखील आहे. रुग्णालय ‘आजारी’ असताना याकडे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी लक्ष देणं गरजेचं आहे, मात्र यासर्व गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करून ते रुग्णालय प्रशासनाला पाठबळ तर देत नाही ना अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे. त्यामुळे आता याकडे जिल्हाधिका-यांनीच लक्ष देणं गरजेचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.