डॉ. पद्माकर मत्ते हल्ला प्रकरणी 4 आरोपींना अटक

जुन्या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी निर्घृण हल्ला

0

विवेक तोटेवार, वणी: डॉ. पद्माकर मत्ते हल्ला प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 1 ते दीड तासांमध्ये आरोपींना भालर टाऊनशीप येथून अटक केली. आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान धारदार शस्त्रााने त्यांच्यावर निघृण हल्ला करण्यात आला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. दिवसाधवळ्या एका डॉक्टरवर हल्ला झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. अमर हनुमान पेंदोर रा. रंगनाथनागर वणी, शुभम ओमप्रकाश खंडारे वास्तू पार्क लालगुडा, सुप्रीम मिलिंद उमरे भालर वसाहत, प्रज्योत महेश उपरे तेली फैल, वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जुन्या प्रकरणाच्या वचपा काढण्यातून त्यांनी निर्घृण हल्ला केल्याचे समोर आले आहे.

डॉ. पद्माकर मत्ते यांचा जत्रा रोड रामपुरा वार्ड येथे दवाखाना आहे. आज सोमवारी दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी ते दवाखान्यात रुग्ण तपासणी करीत होते. 1 वाजताच्या दरम्यान तिथे दोघे अमर पेंदोर हा रुग्ण म्हणून त्याच्या दोन सहका-यांना सोबत घेऊन स्प्लेंडर गाडीने दवाखान्यात आला. दरम्यान डॉ. मत्ते हे रुग्ण तपासणीसाठी कॅबिनमध्ये बसून होते. हे तिघेही आरोपी आत शिरले. त्यातील दोघांकडे गुप्ती होती. त्यांनी गुप्तीने डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर सपासप वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. बचावासाठी प्रयत्न करताना झालेल्या झटापटीत एका आरोपीच्या हाताला देखील गुप्तीचा वार लागला. या हल्लामुळे दवाखान्यात एकच गोंधळ उडाला.

हल्ला केल्यानंतर गुप्ती घेऊनच ते दवाखान्याबाहेर आले. दवाखान्याबाहेर त्यांनी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी सुरू झाली नाही. त्यामुळे त्यांनी गाडी धक्का मारून दवाखान्याच्या पुढे काही अंतरावर तलाव रोडच्या दिशेने नेली. तिथे त्यांनी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी सुरू न झाल्याने त्यांनी गाडी तिथेच ठेवून पळ काढला.

दरम्यान डॉ. मत्ते यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी वा-यासारखी शहरात पसरली. लोकांनी दवाखान्यापुढे एकच गर्दी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार वैभव जाधव देखील आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. डॉ. मत्ते हे कॅबिनमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. त्यांच्या मुलाने दवाखान्यातील कर्मचा-यांच्या मदतीने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे.

अवघ्या एक ते दीड तासात प्रकरणाचा छडा
पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र फिरवले. दरम्यान या हल्ल्याची लिंक आधीच्या प्रकरणाशी असल्याचा त्यांना संशय होता. त्यावरून त्यांनी त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली. दरम्यान मोबाईल ट्रेसिंगची मदत घेतली असता. त्यांना सदर आरोपी हे भालर टाऊनशीप येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक तात्काळ त्या ठिकाणी गेले व तिथून त्यांनी चारही आरोपींना अटक केली.

काय आहे हल्ल्याची पार्श्वभूमी?
तीन साडे तीन महिन्याआधी दिनांक 18 जानेवारी रोजी आकाश उर्फ विकास पेंदोर हा रंगनाथ नगर येथील तरुण तब्येत ठिक नसल्याने डॉ. पद्माकर मत्ते यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून त्याला इंजेक्शन दिले व काही औषधे लिहून दिली. मात्र इजेक्शन घेऊन घरी आल्यावर आकाशची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे आकाशला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. आकाशचा मृत्यू चुकीच्या उपचाराने झाला असा आरोप आकाशच्या नातेवाईकांनी करत डॉ. पद्माकर मत्ते यांना मारहाण करत त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केली होती. तब्बल साडेतीन महिन्यानंतर मृतक आकाशचा भाऊ अमर पेंदोर याने त्याच्या सहका-यांना सोबत घेऊन या प्रकरणाचा वचपा डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर हल्ला करून काढला

अमर हनुमान पेंदोर रा. रंगनाथनागर वणी, शुभम ओमप्रकाश खंडारे वास्तू पार्क लालगुडा, सुप्रीम मिलिंद उमरे भालर वसाहत, प्रज्योत महेश उपरे तेली फैल, वणी या चार आरोपींवर भादंविच्या कलम 307 (34) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक निरीक्षक संदीप एकाडे करीत आहे. दिवसाधवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण

Leave A Reply

Your email address will not be published.