विवेक तोटेवार, वणी: फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आलेल्या बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणात शिरपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील फरार मुख्य सूत्रधार मोहम्मद राजिक जमील अन्सारी (वय 27, रा. यशोधरा नगर, नागपूर) याला नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये खळबळ उडाली असून संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने तपासाला वेग आला आहे. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली असून पुढील तपासासाठी शिरपूर पोलिसांचे विशेष पथक त्याला ताब्यात घेऊन नागपूरहून रवाना झाले आहे. या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे.
फेब्रुवारी महिन्यात शिरपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यावेळी मोहम्मद अन्सारी फरार झाला होता. ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे सातत्याने शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर 29 जून रोजी नागपूर येथे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
या अटकेनंतर वणी शहर व परिसरातील ड्रग्ज तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शहरालगतच्या गणेशपूर परिसरातील एका संशयित ड्रग्ज तस्करावर पोलिसांचे लक्ष केंद्रित असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वणीतील आणखी काही संशयित तस्करांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाणेदार संतोष मनवर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले, “वणी शहरातील अनेक ड्रग्ज तस्कर आमच्या रडारवर आहेत. संपूर्ण ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या अवैध व्यवसायात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल.”
या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांच्या नेटवर्कवर मोठा आघात बसला असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक खुलासे आणि अटकसत्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


Comments are closed.