देवळालाही चोरट्यांचा विळखा; मंदिरातील फॅन लंपास

रात्री मंदिरात शिरला अन् चार फॅन घेऊन पसार झाला चोर

बहुगुणी डेस्क, वणी: श्रद्धास्थान असलेल्या मंदिरालाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना वणी तालुक्यातील डब्ल्यूसीएल कैलासनगर वसाहतीत उघडकीस आली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने हनुमान मंदिरातील चार इलेक्ट्रिक फॅन चोरून नेल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, प्रथम तुकाराम गिलबीले (52), व्यवसाय – WCL मध्ये क्लार्क, रा. कैलासनगर, ता. वणी हे गेल्या 30 वर्षांपासून मुंगोली येथील डब्ल्यूसीएल खाणीत कार्यरत असून कैलासनगर वसाहतीतील क्वार्टरमध्ये वास्तव्यास आहेत. वसाहतीतील हनुमान मंदिराची देखरेखही स्थानिकांकडून केली जाते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शनिवारी (दि. 10 जुलै) मध्यरात्रीनंतर सुमारे 12.35 वाजताच्या सुमारास प्रथम गिलबीले हे जागे झाले. त्यांनी मंदिर परिसरात जाऊन पाहणी केली असता मंदिरात बसविण्यात आलेले दोन सिलिंग फॅन आणि भिंतीवर लावलेले दोन वॉल फॅन गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली. मात्र इतर कोणत्याही वस्तूची चोरी झालेली नसल्याचे आढळले.

चोरीला गेलेल्या दोन सिलिंग फॅनची किंमत प्रत्येकी 2 हजार रुपये, तर दोन वॉल फॅनची किंमत मिळून 5 हजार रुपये असून एकूण 9 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रथम तुकाराम गिलबीले यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

Comments are closed.