संपादकीय – आज महाराष्ट्रातील काही भाजीमंडईचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. लोकांची त्या ठिकाणी अक्षरश: जत्रा भरलेली होती. लोक संचारबंदीला सहकार्य करीत आहे. मात्र मंडईतील गर्दी बघितले की ही संचारबंदी पालथ्या घागरीवर पाणी असल्याचे दिसून येते. चीनमध्यल्या वुहानमध्येही मार्केटमधूनच प्रसार अधिक झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे जर यावर उपाय काढला नाही तर याच ठिकाणाचा संसर्ग वाढवण्यात सर्वात मोठा वाटा असेल.
वणीतील भाजी मंडईतील ठोक व चिल्लर विक्रेत्यांनी स्वयंस्फुर्ती पुढाकार घेऊन भाजीमंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे केवळ रविवारी बाजी मंडी सुरू राहणार आहे. लोकांची मंडईत एकच होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यांचा निर्णय कौतुकास्पद म्हणावा लागेल. यासाठी प्रशासनाकडून कोणताही दबाव नव्हता. मात्र भाजीमंडईत होणा-या गर्दीमुळे संचारबंदीला अर्थ उरत नव्हता. त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या भाजी विक्रेत्यांनी एकत्र येत मंडई बंदचा निर्णय घेतला व परिस्थिती सामान्य होत पर्यंत हा निर्णय लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले. सामान्य लोकांची परवड होऊ नये यासाठी फक्त रविवारी मंडई सुरू राहणार. यामुळे रविवार पर्यंत मार्केटमध्ये कुणी येणार नाही. मात्र रविवारी कसं? तीन दिवस बंद असल्यानंतर त्यानंतर एकच उडणारी झुंबड कशी रोखणार?
वणीच्या मंडईत परिसरातील शेतकरीही माल घेऊन येतो. तोही इथे मालाची ठोक आणि चिल्लर विक्री करतो. त्यांची संख्या मोठी आहे. सोबतच या परिसरात चिल्लर विक्रेत्यांची संख्याही मोठी आहे. त्या उलट मंडईची जागा ही अतिशय कमी असून अतिशय दाटीवाटीत हा बाजार गेल्या अऩेक वर्षांपासून सुरू आहे. जागेची कमतरता असल्याने केवळ आताच नाही तर इथे रोजही तशीच गर्दी असते.
रविवारी तीन दिवस भाजीमंडई बंद असल्याने आणि जागेचा अभाव असल्याने झुंबड उडणार हे निश्चित आहे. त्यावर मात कशी करणार हा मुख्य प्रश्न उपस्थित होतोय. कारण मंडई बंद करणे हे कायमस्वरुपी उपाय नाही.
कशी काढता येऊ शकते उपाययोजना?
भाजी मंडईची जागा कमी असल्याने काही दिवस ही भाजी मंडईच इतर ठिकाणी शिफ्ट करणे हा यावर एक उपाय होऊ शकतो. वणीमध्ये अनेक मैदानं आहेत. उदाहरण घ्यायचं झाल्यास जत्रा मैदान, पाण्याच्या टाकीचे मैदान, एपीएमसी मार्केटचे मैदान, तसेच अनेक ठिकाणी मोकळी मैदाने आहेत तिथे भाजीविक्री सुरू करता येईल. अऩेक ठिकाणी भाजी मंडई सुरू केल्यास एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळता येऊ शकते . तसेच त्या परिसरातील व्यक्तीला परिसरातच भाजीपाल्याची खरेदी करता येऊ शकते.
यासोबतच वणीमध्ये अनेक शाळेचे मैदानं ही आहे. आता शाळा नसल्याने काही दिवस हे मैदानही यासाठी वापरता येऊ शकते. याशिवाय प्रवासी वाहने बंद असल्याने हायवे वरची वाहतूक बंद आहे. त्या हायवेवरही भाजीची विक्री करता येणे शक्य आहे. रोज बंद ठेवण्याऐवजी दोन दिवस आड किंवा आठवड्यातून दोन दिवस सकाळी ते दुपार पर्यंत भाजी विक्री सुरू ठेवता येऊ शकते. त्यामुळे एकाच दिवशी जमणारी गर्दी टाळता येऊ शकते.
रविवारी मंडई सुरू होणार. तीन दिवस बंद असल्याने तिथे गर्दी होणार. तिथली गर्दी रोखली नाही तर आतापर्यंतची सर्व मेहनत पाण्यात जायला वेळ लागणार नाही. तिथे जर एखादा कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्याचा शहरभर संसर्ग वाढण्यास वेळ लागणार नाही सोबतच बाहेरगावाहून विक्रीसाठी आलेल्या शेतक-यांच्या माध्यमातून तो ग्रामीण भागातही तेवढ्याच वेगाने पसरले. त्यामुळे प्रशासनाजवळ तीन दिवसांचा वेळ आहे. त्या दरम्यान त्यांनी मंडईतील विक्रेत्यांशी चर्चा करून काहीतरी ठोस उपाययोजना काढणे गरजेचे आहे.
भाजी खाणे गरजेचेच आहे का?
मंडईमध्ये जी ट्रान्सपोर्टने भाजी येते त्या भाजीला किती लोकांचा स्पर्श होतो. चीनमध्येही असे लक्षात आले की याचा मोठ्या प्रमाणात प्रसार मार्केटमधून झाला. प्रशासनही म्हणत आहे की परिस्थिती गंभीर झाली तर त्याला कंट्रोल करण्यात आपल्याला शक्य नाही कारण त्यासाठी असणारे संसाधनं, सोयीसुविधा, मनुष्यबळ आपल्याकडे नाही. त्यामुळे यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आहे. घराबाहेर न पडणे. घरात एकटे राहणे, एकदुस-यांना स्पर्श न होऊ देणे होय. सरकारही याच गोष्टींचा सर्वाधिक अवलंब करण्यास सांगत आहे. त्यामुळे भाजीसाठी बाहेर निघणे गरजेचे आहेच का?
दुधाला पर्याय नाही पण भाजीला पर्याय आहे. कडधान्य हा भाजीला तितकाच प्रभावी पर्याय आहे. त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटिन्सही असतात. त्यामुळे मुंग, चना, वटाणा, मसूर, राजमा, तूर, इत्यादी कडधान्याचा चांगला पर्याय आहे. याबाबत ही प्रशासनाने लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. कडधान्याचा वापर वाढवणे सुरू केल्यास भाजीपाल्यासाठी बाहेर निघणे आपसुकच कमी होऊ शकते.
परिस्थिती गंभीर आहे. आणखी गंभीर झाल्यास त्याच्या परिणामाचा आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे घराबाहेर निघणे हे टाळणे हाच यावर उपाय होऊ शकतो… काळजी घ्या….
– निकेश जिलठे
9096133400