सरपंचासाठी सर्वच पक्षाचे दावे – प्रतिदावे

विजयी सरपंच आमच्याच पक्षाचा असल्याचा दावा

0
विलास ताजने वणी :- वणी उपविभागातील वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारला जाहीर झाले. यात सेना, काँग्रेस आणि भाजपा या तीनही पक्षाला कमी अधिक प्रमाणात यश मिळाले. मात्र सरपंच थेट जनतेतून निवडून आले असले तरीही सर्वच पक्ष विजयी सरपंचावर आपापला दावा सांगत आहे.

वणी तालुक्यातील शिवसेनेचे चिखलगाव येथील सुनील कातकडे गटाला, गणेशपूर येथे तेजराज बोढे यांना प्रचंड यश मिळाले. परंतु शिंदोला येथील शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य संजय निखाडे यांच्या शेतकरी शेतमजूर पॅनलला ९ पैकी ६ जागा  मिळाल्या. मात्र ३ जागासह सरपंचपद लुकेश्वर बोबडे, शांतीलाल जैन, मुरलीधर ठाकरे यांच्या किसान मजदूर आघाडीला मिळाले.  विठ्ठल बोन्डे यांना ६३५ तर नंदू गिरी यांना ६१८ मते मिळाली. नंदू गीरी यांचा १७ मतांनी पराभव झाला.सरपंच पदाची माळ बोन्डे यांच्या गळ्यात पडली.

मेंढोली येथील निवडणूक रंगतदार झाली. पवन एकरे, मनोज काळे, ऍड. विनायक एकरे , डॉ. भाऊराव कावडे यांच्या नेतृत्वातील चार गटात निवडणूक झाली. यात पवन एकरे यांना ४०४, मनोज काळे ३०६, प्रवीण एकरे ३०० तर शत्रुघ्न दानव यांना २४२ मते मिळाली. पवन एकरे यांनी मनोज काळे यांचा ९८ मतांनी पराभव केला. सरपंच पद मोठ्या फरकाने पवन एकरे यांना मिळाले.

सरपंच थेट जनतेतून निवडून आले असले तरीही सर्वच राजकीय पक्षांनी आपापला दावा ठोकला आहे. कळमना, कुरई, कायर, चारगाव,शिंदोला, बोर्डा, वरझडी, रांगणा या आठ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात असल्याचा दावा आमदार बोदकुरवार यांनी केला. चिकलगाव,गणेशपूर, पुरड (ने),वेळाबाई, केसुरली,साखरादरा, अहेरी, ब्राह्मणी, वरझडी, रांगणा या दहा ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असल्याचा दावा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला. यात रांगणा आणि वरझडी या ग्रामपंचायतीवर शिवसेना व भाजपाचा या दोन्हीचा दावा आहे.

मेंढोली व मंदर ग्रामपंचायतीवर अनुक्रमे पवन एकरे व अनंतलाल चौधरी यांनी नेतृत्व करीत काँग्रेसचा गड राखला. सरपंचपद मिळाले असले तरी बहुमत नसल्याने याचा परिणाम ग्रामपंचायतच्या विकास कामावर होणार आहे. अनेक ठिकाणी सरपंच व उपसरपंच वेगवेगळ्या गटाचे असणार आहे. त्यामुळे हेवेदावे विसरून एकत्र आले तरच गावाचा विकास साध्य होणार आहे. अन्यथा हेही पाच वर्षे व्यर्थ गेल्याची भावना ग्रामस्थात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.