शेतात इलेक्टिक शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

आईचा एकुलता एक आधार गेला, सुकनेगाव येथील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: शेतातील बोअरवेलची मोटर सुरु करण्याकरिता गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा जबर शॉक लागून दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना सुकनेगाव येथे घडली. अविनाश विलास निखाडे (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आईचा व कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाच्या दुर्देवी मृत्युमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार अविनाश 3 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे अविनाशच्या आईने अविनाश आणि त्याच्या बहिणीचे पालनपोषण केले. मोठा झाल्यावर अविनाश काकासोबत वडिलोपार्जित शेतीत हातभार लावत होता. गावाला लागूनच अविनाश निखाडे यांची अंदाजे 7 एकर शेती आहे.

सोयाबीन काढणीनंतर त्यांनी चणा पेरणीची तयारी सुरू केली होती. त्यासाठी शेतात ओलावा करण्याचे कामे सुरू केले. दरम्यान आज शनिवार 30 ऑक्टो. रोजी अविनाश आपल्या काका संतोष निखाडे सोबत शेतात गेला. शेतातील बोअरवेलची स्टार्टर पेटी उघडण्यासाठी पेटीला हात लावताच अविनाशला विजेचा जोरदार शॉक बसला व तो दूरवर फेकला गेला.

थोड्या अंतरावर उभे असलेले अविनाशचे काका संतोष विठ्ठल निखाडे यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी लगेच आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून परिसरातील श्तक-यांनी शेताकडे धाव घेतली. अविनाशला बेशुद्ध अवस्थेत निपचीत पडला होता. त्याला लगेच वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अविनाशला मृत घोषित केले.

वडिलांच्या मृत्युनंतर आईचा एकुलता आधार असलेल्या अविनाशच्या मृत्यूमुळे संपूर्ण सुकनेगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान गावातच अविनाशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे देखील वाचा:

शाळकरी मुलीवर तरुणाचा अत्याचार, मुलगी 7 महिन्यांची गर्भवती

तोल जाऊन मजूर कोसळला थ्रेशर मशीनमध्ये, मृतदेहाची चाळणी

आधी वस्तूंचा डेमो बघा, नंतरच वस्तू खरेदी करा

Comments are closed.