विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त, विरोधक एकवटले
विजेच्या खेळखंडोबा बाबत सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा
बंटी तामगाडगे, वणी: वणी शहरातील विद्युत पुरवठा वारंवार बंद होत असल्यामुळे वणीतील जनता व व्यापारीवर्गाला नागत त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सूर्य आग ओकत आहे. शहरात रोज अनेकवेळा लाईट जाते. तर कधी कधी रात्रभर लाईट नसते. त्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमवारी सर्वपक्षाच्या पदाधिका-यांनी आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. तसेच विजेचा खेळखंडोबा थांबला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनातून दिला आहे.
वणी शहरात विद्युत पुरवठा वेळीअवेळी बंद राहत असल्यामुळे जनतेला पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. विद्यूत दाब कमी जास्त होत असल्यामुळे त्यावर चालणारी उपकरणे खराब होत असल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत. याबाबत अनेकदा संबंधित विभागातील अधिका-यांना विचारणा केली असता अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देतात. तसेच अनेकदा फोन केल्यावरही फोन उचलला जात ऩाही. त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अखेर या गंभीर समस्येबाबत सर्वपक्ष आणि संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी याविरोधात एल्गार पुकारला आहे.
या समस्येसोबतच वणी शहरात सर्व अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहेत. कोळसा चोरी, मटका, सोनसाखळी ओढणे यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या सर्व बाबींकडे प्रशासनाने ताबडतोब लक्ष द्यावे व कार्यवाही करवी व या शहरात वीद्दुत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे निवेदन देऊन मागणी केली आहे. जर येत्या ३ दिवसात या सर्व बाबींवर योग्य ती कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी सर्वपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.