विद्युत चोरी प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

वीज पुरवठा खंडित केल्यानंतरही करीत होत्या वीजचोरी

विवेक तोटेवार, वणी: वीज बिल थकीत असल्याने एका महिलेचा घराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तिने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या घरून वीज पुरवठा अनधिकृत जोडून वीज घेतली. त्यानंतर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेचेसुद्धा वीज बिल बाकी असल्याने तिचाही वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

यानंतर या दोघीनीही अनधिकृत वीज जोडणी करून वीज वापरत होत्या. ही घटना 16 नोव्हेंबर रोजी जैताई मंदिर परिसरात घडली. सहाय्यक अभियंता महावितरण यांच्या तक्रारीवरून दोन महिलांवर विद्युत चोरी प्रकरणी वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैताई मंदिर परिसरात राहणाऱ्या भावना विश्वनाथ मेहता (45) यांचे बिल थकीत असल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

भावना यांनी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कांता मेहता यांच्या कनेक्शनवरून आपला वीज पुरवठा जोडून घेतला. त्यानंतर कांता यांचा वीजपुरवठा वीज बिल थकीत असल्याने खंडित करण्यात आला. त्यांच्यावर 1 लाख 36 हजार 960 रुपये इतके वीजबिल थकीत होते.

याबाबत महावितरण कडून त्यांना नोटीसही देण्यात आली होती. या दोघींचाही दोनदा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परंतु त्यांनी परस्पर वीज पुरवठा जोडून घेतला व वीज बिल भरण्यास नकार दिला. शेवटी सुदर्शन शंकरराव इवनाते सहाय्यक अभियंता महावितरण यांच्या तक्रारीवरून या दोघींविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 138 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल बुरेवार करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.