सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जनतेला हत्तीपाय रोग पसरू नये याकरिता आरोग्य विभागातर्फे प्रत्येक गावात जनजागृती करणे व औषधी वाटप सुरू आहे. हत्तीपाय निर्मूलन करीता व जंतुनाशक औषधीचे वाटप आरोग्य विभागाचे एएनएम आशावर्कर, अंगणवाडी सेविका हे घरपोच औषधी वाटप करीत आहे. 1 जुलै ते 3 जुलै पर्यंत औषधी वाटप कार्यक्रम आरोग्य विभाग जिल्हा परिषद यवतमाळ व तालुका आरोग्य विभाग झरी यांच्या मार्फत सुरू आहे.
तालुका पातळीवर 2 वर्षावरील सर्व जनतेनी हत्तीपाय व जंतूनाशक औषधी घ्यावी व हत्तीपाय आजारापासून दूर रहावे. असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. तालुक्यात 2 वर्षावरील लाभार्थी 66 हजार 539 आहे तर औषधांची मागणी 1 लाख 71 हजार 871 लाभार्थ्यांकरिता करण्यात आली. तसेच जंतूनाशक औषधी 67 हजार मागविण्यात आली ती सर्व औषधी तालुक्याला प्राप्त झाली आहे.
हत्तीपाय आजार हा बुलेक्स नावाचा डास चावल्याने होतो. डास चावताच माणसाला हत्तीपाय आजार होत नाही, परंतु याचा परिणाम 5 वर्षानंतर दिसून येतो व त्याचे लक्षण महिला व पुरुषामध्ये पहायला मिळते. महिलांच्या काखेत स्तनांमध्ये तर पुरुषांच्या अंडवृद्धी मध्ये वाढ ही त्याची लक्षणे आहेत. हत्तीपाय आजार एकदा झाला की त्याला इलाज नाही व त्या व्यक्तीला मृत्यू शिवाय पर्याय नाही त्याकरिता तालुक्यातील सर्व जनतेनी स्वतः हुन औषधी घेऊन खावे व हत्तीपाय आजारापासून दूर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हत्तीपाय व जंतुनाशक गोळ्या 2 वर्षाखालील मुलांना व आजारी व्यक्तींना देऊ नये असेही सांगण्यात आले आहे. हत्तीपाय निर्मूलन कार्यक्रमात तहसीलदार ,गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी सरसावले असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावपुढारीसह इतर लोकांनी गावकऱ्यांना हत्तीपाय आजाराच्या गोळ्या घेऊन खाण्यास जागृत करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी केले आहे.