सिमेंट रोड होताच दोन्ही बाजूंनी अतिक्रमणाचा सपाटा

सर्व्हिस रोडवर पक्के बांधकाम होत असताना नगर परिषद मूग गिळून

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते साई मंदिर चौकापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र सिमेंट रस्त्याच्या काम पूर्ण होण्या अगोदरच रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी अतिक्रमणाचा सपाटा लावला आहे. काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानाच्या पुढे अवैधरित्या पक्के बांधकाम सुरु केले आहे. तर काहीजणांनी घरापुढे रस्त्याला लागून असलेल्या ले आऊट सर्व्हिस रोडवर पक्की दुकाने बांधण्यास सुरवात केली आहे. उघडपणे अवैध अतिक्रमण होत असताना मात्र नगर परिषद बांधकाम विभाग मूग गिळून असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे याच मार्गावरील गजानन महाराज मंदिराच्या पुजाऱ्याने मंदिरासमोर टिनाच्या शेडमध्ये भोजनालय सुरु केले असता नागरिकांच्या तक्रारीनंतर नगर परिषद यांनी नोटीस देऊन भोजनालयचा अतिक्रमण काढले. मात्र आता काही धनदांडगे व राजकीय लागेबांधे असलेल्या लोकांनी याच मार्गावर रस्त्याला लागून पक्के अतिक्रमण करताना तक्रारकर्ते व नगरपरिषद गप्प का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सिमेंट रस्त्याच्या मध्येपासून 15 मीटर पर्यंतची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची आहे. त्यानंतर नियमाप्रमाणे 4.50 मीटर जागा सर्व्हिस रोड म्हणून आरक्षित असते. मात्र व्यावसायिकांनी बिल्डिंग लाईन सोडून सर्व्हिस रोडवर दुकानाचे बांधकाम सुरू केले आहे. या मार्गावर बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर, ऑटोमोबाईल, मोटार गॅरेज, हॉटेलसह इतर शेकडो दुकाने तसेच रहिवासी इमारती आहे. रस्त्याला लागून पक्के अतिक्रमण झाल्यास या दुकानावर येणाऱ्या ग्राहकांना आपले दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरच पार्किंग करावे लागणार आहे. त्यामुळे या राज्यमार्गावर वाहतुक कोंडीची समस्या “जैसे थे’ राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

सदर सिमेंट रस्त्याच्या दोन्ही बाजूने नगर परिषद बांधकाम विभागाने आपली हद्द मार्किंग करून बिल्डिंग लाईनपुढे झालेले व हल्ली सुरु असलेले बांधकाम पाडण्यात यावे अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा: 

आनंदाची बातमी… वणी सुरू होत आहे फुड डिलिव्हर ऍप

दरोड्यातील आरोपीला 4 दिवसांचा पीसीआर

Comments are closed.