दरोड्यातील आरोपीला 4 दिवसांचा पीसीआर

45 लाखांची रोकड जप्त करण्याचे पोलिसांपुढे आव्हान

जितेंद्र कोठारी, वणी: जिनिंग कर्मचाऱ्यांकडून 45 लाखाची रोकड लूट प्रकरणी राजस्थान येथून अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी ओमप्रकाश चेनाराम बिश्नोई याला वणी न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेच्या तब्बल 8 महिन्यानंतर गुरुवार 15 डिसेंबर रोजी राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील राहत्या घरुन वणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. सपोनि संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक शुक्रवार 17 डिसेंम्बरच्या रात्री आरोपीला घेऊन वणीत पोहचले. त्यानंतर शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर करून 7 दिवसाच्या पीसीआरची मागणी पोलिसांनी केली होती.

पोलीस कोठडी दरम्यान दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी इतर आरोपींबाबत आरोपीकडून माहिती मिळविणे तसेच लुटलेली रोकड जप्त करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. दरोडा टाकण्याची योजना तयार करणाऱ्या बाबूलाल बांगडवा नावाच्या आरोपीला पोलिसांनी एप्रिल महिन्यातच अटक केली होती. मात्र त्याच्या कडून लुटारुंचे नाव पत्ता वगळता इतर काहीही माहिती हाती लागली नाही.

दरोड्यात प्रत्यक्ष सहभागी ओमप्रकाश, जितू, हनुमानाराम, सोमराज, सहीराम व कारचालक भंवरलाल हे कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर राजस्थानसह इतर राज्यात अनेक गुन्हा दाखल आहे. अटक करण्यात आलेले आरोपी ओमप्रकाश बिश्नोईवर राजस्थान येथील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 16 गुन्हे दाखल असून पोलीस दप्तरी हिष्ट्रीशीटर म्हणून त्याची नोंद आहे. दरोड्यात सहभागी जितू नावाचा आरोपी सदया जोधपूर जिल्हा कारागृहात बंद आहे. कारागृहातुन आरोपीची कस्टडीची मागणी वणी पोलिसांनी केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे कस्टडी मिळू शकली नाही.

वणी शहराच्या इतिहासात सर्वात मोठा दरोड्याचा या गुन्ह्याचा तपास एसडीपीओ संजय पूज्जलवार करीत आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीचा इतर काही गुन्ह्यात सहभाग आहे का? याचीही चौकशी पोलीस करणार आहे.

हे देखील वाचा:

उमेद पार्क येथे नवीन ड्युप्लेक्स/बंगला विकणे आहे

आनंदाची बातमी… वणी सुरू होत आहे फुड डिलिव्हर ऍप

Comments are closed.