सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील वणी ते मुकुटबन मुख्य मार्गावरील लेआऊट मधील प्लॉटधारकाने ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार आहे. त्यानुसार तिथे शौचालय तथा दुकान बांधल्याचं म्हटलं आहे. बांधकाम केलेल्या संडासचे पाणी व दुकानातील पाणी घरात शिरत असल्याने गारमेलवार कुटुंबीय त्रस्त झालेत. तरी सदर अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी तक्रारीतून केली होती.
गजानन दमडाजी गारमेलवार अनेक वर्षांपासून लिंगारेड्डी अंडेलवार लेआऊट मध्ये राहत आहे. प्लॉटधारकांनी दुकानाची चाळ काढून दुकाने भाड्याने दिली आहेत. सदर दुकानदाराने स्वतःच्या जागेच्या व्यतिरीक्त सरकारी जागेवर अतिक्रमण करून दुकान बांधले. बोअर मारले. कोंबडे पालन करण्याकरिता बेंदे उभारले आहे. कोंबड्याचे बेंदे धुण्याचे पाणी, बोअरचे पाणी तसेच अतिक्रमित जागेवरचे पाणी लेआऊटमधील भोयर यांच्या प्लॉटमधून गारमेलवार यांच्या घरात घुसत असल्याने गारमेलवार कटुंबिय त्रस्त झाले आहे.
शासनाच्या ज्या नियमाने लेआऊट मंजूर करून प्लॉट पाडण्यात आले त्या नियमांचे पालन करून इतर संपूर्ण अतिक्रमण काढून दोन्ही साईडला नाली बांधकाम करावी. वॉर्ड क्र ५ मध्ये येणाऱ्या याच लेआउटच्या मुख्य मार्गावर नवीन शौचालय बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. प्लॉटधारकांना येण्या जाण्याकरिता एकमेव रस्ता आहे. या शौचालयामुळे तेथील जनतेला येण्या-जाण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सदर अतिक्रमण करणाऱ्याने ग्रामपंचायतीच्या नालीच्यावर शौचालय बांधकाम केले आहे. याबाबत वॉर्डातील जनतेने ग्रामपंचायतीला तक्रारसुद्धा केली होती. परंतु ग्रामपंचायतने अतिक्रमण करून बांधलेले शौचालय पाडले नाही. वॉर्डातील जनतेला याच मार्गाने मोटर सायकलने व पायी जाणे येणे करावे लागते. वाहन शौचालयाला धडक लागून पडले किंवा अपघात होऊन कुणी जखमी झाल्यास याला जवाबदार कोण? असाही प्रश्न तक्रारीतून उपस्थित करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालय यांनी लिंगारेड्डी लेआऊट मधील मुख्य मार्गावरील दुकान, बोअर, कोंबड्याचे बेंदे व शौचालय त्वरित काढण्यात यावे. शौचालय तसेच अतिक्रमित जागेवरचं पाणी घरात जाणार नाही. अशी व्यवस्था करावी व लेआऊट धारकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता त्वरित घ्यावी. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा गारमेलवार यांनी ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस स्टेशन यांना दिलेल्या तक्रारीतून दिला.
याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन सदर तक्रारीची दखल घेत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना लिंगारेड्डी लेआऊट मधील तक्रारीत नमूद असलेल्या अतिक्रमनाची शासन नियमानुसार कार्यवाही करून अहवाल मागितला आहे. लेआऊटमधील अतिक्रमणाबाबत गटविकास अधिकारी कोणती कार्यवाही करून जिल्हाधिकारी यांच्याकडे कसा अहवाल पाठवितात याकडे लेआऊटधारक व ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)