नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

साहित्य चळवळीच्या केंद्रबिंदूला नवे नेतृत्व: दिडशे वर्षांच्या वारशाला पुढे नेण्याचा संकल्प

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील साहित्य व शैक्षणिक चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची एकमताने निवड झाली आहे. हे 150 वर्षांच्या वैभवशाली वारशाला नवे बळ देणारे पाऊल ठरले आहे. 1874 मध्ये इंग्रज काळात स्थापन झालेल्या या अ वर्ग वाचनालयाचे अध्यक्ष माधवराव सरपटवार यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. या पदासाठी संचालक समितीच्या बैठकीत बोदकुरवार यांची निवड करण्यात आली. 7 डिसेंबर रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. ज्याने वाचनालयाच्या भविष्याबाबत उत्साह निर्माण झाला आहे.

नगर वाचनालय हे वणीच्या सांस्कृतिक व शैक्षणिक वारशाचे प्रतीक असून, येथे 27,000 पेक्षा अधिक ग्रंथसंपदा आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रे व मासिके वाचकांसाठी उपलब्ध असून, दरवर्षी 40 दिवाळी अंक 300 रुपयांच्या वार्षिक फीसने वर्षभर उपलब्ध होतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 30 रुपयांच्या मासिक वर्गणीत सर्व पुस्तके उपलब्ध असून, रोज 40 ते 50 विद्यार्थी अभ्यासिकेत नियमित अभ्यास करतात. या वाचनालयाने नवोदित व मान्यताप्राप्त वक्त्यांना व्यासपीठ देऊन साहित्य चळवळीला चालना दिली आहे. प्राचार्य राम शेवाळकर, स्वातंत्र्य सैनिक नानाजी भागवत, रतनलालजी जयस्वाल, डॉ. दिनकर मंगदे व माधवराव सरपटवार यांसारख्या व्यक्तींच्या परिश्रमामुळे वाचनालयाला वैभव प्राप्त झाले आहे.

पदभार ग्रहणाच्या प्रसंगी उपाध्यक्ष विशाल झाडे, सचिव गजानन कासावार, संचालक हरिहर भागवत, प्राची पाथ्रडकर व कर्मचारी वृंद उपस्थित होते. बोदकुरवार यांनी सांगितले, “वाचनालयाच्या वारशाला पुढे नेमण्यासाठी साहित्य चळवळीला नवे व्यासपीठ देऊन वणीला शैक्षणिक केंद्र बनवू.” ही निवड वणीच्या सांस्कृतिक जीवनाला नवे आयाम देईल, असा विश्वास आहे. 

Comments are closed.