वणीतील सशस्त्र दरोडा: महिला मास्टरमाईंडसह तिघांना अटक

सीसीटीव्ही फुटेज व सायबर सेलच्या तपासातून आरोपींचा शोध लागला

बहुगुणी डेस्क, वणी: संत गाडगे बाबा चौकातील ज्वेलरी व्यवसायी संजय निळकंठराव कोंडावार यांच्या घरी 30 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजता 5 ते 6 शस्त्रधारी दरोडेखोरांनी धाडसी हल्ला करून 12.85 लाखांचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लुटली. चौकीदार व व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून बांधलेल्या या घटनेने शहरात भीती पसरली असली तरी एलसीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे केवळ 7 दिवसांत गुन्हा उघडकीस काढला. मास्टरमाईंड वैशाली संजय वाघमारे (45) सह तिघांना अटक करून 13.22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.

संजय निळकंठराव कोंडावार (74, रा. संत गाडगे बाबा चौक) हे ज्वेलरी व्यवसायी असून, दुकान व घर जवळजवळ असल्याने त्यांनी चौकीदार नेमला होता. 30 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजता चार शस्त्रधारी दरोडेखोर (तोंडाला स्कार्फ बांधलेले) दुकानासमोर आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत चौकीदाराला हात-पाय बांधले आणि घरात घुसले. घरमालकाला जागृत करून त्यांना बांधले आणि तोंडात कपडा कोंबला. दरोडेखोरांनी अलमारी फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. लुटमार केल्यानंतर ते तात्काळ पळून गेले. काही वेळाने बांधलेल्या अवस्थेतून सुटका करून घरमालक व चौकीदाराने एकमेकांची मदत केली आणि वणी पोलिसांना कॉल केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

माहिती मिळताच वणी पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी धावले. तपासात एलसीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचे निश्चित केले. पुढे एसडीआर व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आला. धक्कादायक माहिती पुढे आली की, मास्टरमाईंड वैशाली संजय वाघमारे (45, रा. न्यू नरसाळा, नागपूर, ह.मु. यवतमाळ) ही मे महिन्यापासून व्यापाऱ्याच्या दुकानात ग्राहक म्हणून येत-जात होती. दोन महिन्यांपूर्वी तिने घराची रेकी करून साथीदारांना संपूर्ण माहिती दिली होती. मात्र, दरोडा टाकताना तिला पूर्वसूचना न दिल्याचे तिच्या कबुलीजबाबात नमूद झाले आहे.

एलसीबी पथकाने या प्रकरणात वैशाली वाघमारे, ऋतिक लीलाधर गेडाम (रा. विठ्ठलवाडी, यवतमाळ) आणि सागर बजरंग थोंगडे (34, रा. यवतमाळ) यांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपींकडून 65,835 रुपयांची रोख, 11.87 लाखांचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व दोन मोबाईल हँडसेट असा एकूण 13.22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई एसपी कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात सहायक पोलिस निरीक्षक दत्ता पेंडकर, उपनिरीक्षक धनराज हाके तसेच अंमलदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, नीलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, नरेश राऊत, सतीश फुके, दिगांबर पिलावन व वणी पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने यांचा समावेश होता. या घटनेने शहरात भीती पसरली असून, पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.

Comments are closed.