नगरसेवक ‘माजी’ झाल्याने नागरिकांच्या समस्या कोणी ऐकेनात

तक्रार करण्यासाठी कुणाकडे जायचे याबाबतही संभ्रम... निवडणूक लांबणीवर गेल्याने इच्छुकांमध्ये अनुत्साह

जब्बार चीनी, वणी: नगरपालिकेचा कार्यकाळ संपून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे सध्या पालिकेचा कारभार सांभाळण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जनतेचा नगरसेवक हा ‘माजी’ झाल्याने वार्डातील समस्येकडे माजी नगरसेवक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे लोकांच्या समस्या सुटण्यास चांगलीच अडचण येत आहे. शिवाय प्रशासक नेमल्याने समस्या कुणाकडे द्याव्यात याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

31 डिसेंबर 2021 रोजी वणी नगरपालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यामुळे नियमाप्रमाने नगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या वणीचे तहसीलदार हे नगरपालिकेचे प्रशासक म्हणून काम पाहत आहे. नागरिकांना अद्यापही आपली समस्या सांगण्यासाठी व सोडवण्यासाठी सर्वात आधी नगरसेवक आठवतो. त्यानुसार ते नगरसेवकांशी संपर्क साधतो. मात्र कार्यकाळ संपल्याने नगरसेवकांवरही बंधन आलेत. शिवाय अधिकारीही त्या समस्येला गांभीर्याने घेणार का? याबाबतही ते साशंक असतात. त्यामुळे माजी नगरसेवकांचे देखील लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिक जेव्हा समस्या घेऊन नगरसेवकांकडे जातात तेव्हा कार्यकाळ संपला, आता आमच्या हातात काहीच नाही असे उत्तरही काही माजी नगरसेवक देत असल्याची तक्रार नागरिकांची आहे.  

तक्रार करण्यासाठी कुणाकडे जायचे?
कार्यकाळ संपल्याचा नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर परिणाम जाणवत असल्याचे दिसत आहे. गेल्या 5 वर्षांच्या काळात काही नगरसेवक हे सक्रीय होते तर काही निष्क्रीय होते. काही नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढवायची आहे. असे नगरसेवक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेताना दिसत आहे. मात्र निष्क्रीय नगरसेवक आधीच नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नव्हते. असे नगरसेवक कार्यकाळ संपल्याचे सांगून त्यांना पालिकेचा रस्ता दाखवत आहेत. सध्या मुख्याधिकारी व प्रशासक असे दोन अधिकारी असल्याने अनेक नागरिक नेमकी तक्रार कुणाकडे करायची याबाबत अद्यापही अनभिज्ञच आहे. 

आपल्या तक्रारी न. प. प्रशासनाकडे द्याव्यात
सध्या नगरपालिकेचा कार्यकाळ संपला असला तरी नागरिकांच्या ज्या काही समस्या असेल त्या सोडवण्यात येईल. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी नगर पालिका प्रशासनाकडे द्याव्यात, असे आवाहन वणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस यांनी केले आहे.

पालिकेची निवडणूक लांबणीवर गेल्याने अनुत्साह
पालिकेची निवडणूक मे मध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या अडचणीमुळे ही निवडणूक आता दिवाळीनंतर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आजी, माजी, इच्छुक असे सर्वच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी लागले होते. मात्र आता निवडणूक आणखी 6 ते 7 महिने लांबणीवर गेल्याने त्यांच्यातील उत्साहही अचानक कमी झाला आहे. अशातच जे नगरसेवक पुन्हा लढण्यास इच्छूक नाही. अशा नगरसेवकांनी तर सध्या आराम करण्यातच धन्यता मानली आहे.

हे देखील वाचा:

वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9

कोणता प्रभाग राहणार राखीव? कोणता प्रभाग सर्वात मोठा व सर्वात लहान?

वणीत भाजपचे जोरदार निदर्शने, नोटीसची करण्यात आली होळी

 

 

Comments are closed.