बहुगुणी डेस्क, वणी: संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने वणी नगरीत प्राचीन वैज्ञानिक ऋषींची ओळख करून देणारी अभिनव प्रदर्शनी बुधवार दिनांक 22 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळात जैताई मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.
यामध्ये गृत्समद, भरद्वाज, भृगु, गौतम ,अगस्ती, पराशर ,विश्वामित्र इत्यादी अतिप्राचीन ऋषींसह आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमिहीर, बोधायन, मेधातीथी इत्यादी गणिताचार्य;चरक ,सुश्रुत, वाग्भट्ट, सुरपाल, शालिहोत्र ,जीवक इत्यादी आयुर्वेद तज्ञ; विश्वकर्मा, मयासुर ,मानसार इत्यादी स्थापत्यविशारद; पाणिनि, पतंजली इत्यादी व्याकरणकार यांच्यासह भरतमुनि, नागार्जुन ,लगध आर्य चाणक्य इ. विविध प्राचीन भारतीय मनीषींची, त्यांचे ग्रंथ, महत्त्वपूर्ण शोध आणि त्यांनी मांडलेले सिद्धांत इत्यादींच्या आधारे सचित्र ओळख करून देण्यात येणार आहे.
अशा स्वरूपात प्रथमच सादर होत असलेल्या या प्राचीन वारस्याचा आनंद समस्त जनतेनी बहुसंख्येने घ्यावा अशी विनंती संस्कृत भारती ,जैताई देवस्थान आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा संस्कृत विभाग या आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.