सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसारा येथील एका आदिवासी समाजातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्या तरुणाचा ज्या दिवशी साक्षगंध होता त्या दिवशी हातात अंगठी घालण्याऐवजी हातात पोलिसांच्या बेड्या घालण्याची वेळ आली.
मुकूटबन येथून 6 किमी अंतरावर असलेल्या कोसारा येथे आरोपी महेश विलास भोयर (31) राहतो. त्याचे त्याच गावातील एका 23 वर्षीय मुली सोबत दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. महेश याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरी जाऊन अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. त्यांचे संबंध सुरळीत सुरू होते. त्यातच महेशचे लग्न जमल्याची कुणकुण सदर मुलीला लागली.
त्याबाबत तिने महेशला विचारणा केली व लग्न करण्याची गळ घातली. मात्र महेशने ती फेटाळून लावली. अखेर मुलीला मुलाने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर पीडित मुलीने दिनांक 19 मे रोजी मुकूटबन पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. यावरून पोलिसांनी मुलीची फसवणूक करणे, घरात प्रवेश करणे व शारीरिक शोषण करणे यासह ऍट्रोसिटी ही दाखल केली आहे.
साक्षगंधाच्या दिवशीच हातात बेड्या…
आरोपी महेश भोयर याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 19 मे रोजीच त्याचा साक्षगंध होता. परंतु साक्षगंधाच्या अंगठी ऐवजी महेशला हातात पोलिसांची हातकडी घालावी लागली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार धर्मा सोनुने करीत आहे.