आयसोलेशनमधल्या ‘त्या’ तिघांचा मरकजमध्ये सहभाग नाही

'वणी बहुगुणी'चे फॅक्ट चेक, फॅक्टचेकमध्ये अनेक गोष्टी उघड

0

जब्बार चीनी, वणी: वणीतील 5 जणांना खबरदारी म्हणून यवतमाळ येथील आयसोलेशन वार्ड मध्ये हलवण्यात आले होते. त्यातील खरबड्यातील तिघे निजामुद्दीन येथील तबलीगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झाल्याची चर्चा संपूर्ण शहरासह खेडोपाड्यात रंगली होती. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र ‘वणी बहुगुणी’ने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये ते तिघे खरबड्यातील रहिवाशीही नाही व ते मरकजमध्ये सहभागीही झाले नाही अशी माहिती समोर आली आहे.

पाच व्यक्तींना यवतमाळ येथे आयसोलेशन वार्डात हलवल्याने आले होते. त्याला निजामुद्दीन येथील मरकज प्रकरणाची किनार असल्याने वणी शहरच नव्हे तर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यावरून विविध अफवांनाही ऊत आला होता. वॉट्स ऍप आणि सोशल मीडयात विविध अफवा पसरवण्यात आल्या होत्या. त्या चर्चांना विराम मिळावा यासाठी ‘वणी बहुगुणी’ने फॅक्ट चेक केले. यात अनेक गोष्टी समोर आल्यात.

फॅक्ट चेकमध्ये काय समोर आले? 

वणीतील एका चिकन व्यावसायिकाचा माल घेऊन 3 गाड्या वणी येथून दिल्ली येथे गेल्या होत्या. प्रत्येक गाडीत ड्रायव्हर आणि क्लिनर (हेल्पर) अशा दोन व्यक्ती होत्या. तिन्ही गाड्या दिल्ली येथे मार्केटमध्ये पोहोचल्या. तिथे एक गाडीतील माल खाली करण्यात आला. मात्र उर्वरित दोन गाड्यातील माल खाली करण्यास आणखी 2-3 तासांचा अवधी होता. त्यामुळे या सहा व्यक्तींपैकी तीन व्यक्ती निजामुद्दीन येथील दर्ग्यावर गेले. दरम्यान उर्वरित दोन गाड्यांचा माल खाली केल्यावर या तिन्ही गाड्या वणीत परतल्या.

दिल्लीतील निजामुद्दीन दर्गा

तबलीगीचे मरकज प्रकरण उघडकीस आल्यानंतर दिल्ली प्रशासनाने निजामुद्दीन परिसरातून इतर ठिकाणी गेलेल्या सर्व लोकांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले. त्यांचा डेटा गोळा केला. त्यात तीन क्रमांक वणीचे असल्याचे आढळून आले. त्याची माहिती वणी प्रशासनाला मिळाली. त्यानुसार त्यांनी या तिन्ही क्रमांक असलेल्या व्यक्तींना खबरदारी म्हणून यवतमाळ येथील आयसोलेशन वार्ड मध्ये भरती केले.

हे तिन्ही लोक खरबडा परिसरातील असल्याची चर्चा वणीत रंगली होती. मात्र फॅक्ट चेक केले असता यातील कोणतीही व्यक्ती खरबड्यातील नसल्याचे समोर आले आहे. यातील एक व्यक्ती ही खरबडा परिसराच्या जवळ असलेल्या शास्त्री नगरचे शेवटचे टोक असलेल्या इस्लामपु-यातील तर उर्वरीत दोन व्यक्ती ह्या जंगली पीर दर्गा परिसर वागदरा रोड येथील असल्याचे कळले. ते तिन्ही व्यक्ती खरबडा परिसरात असल्याची जी चर्चा रंगली होती, ती केवळ अफवा असल्याचे फॅक्ट चेकमध्ये समोर आले आहे.

आयसोलेशन वार्ड संग्रहित चित्र

ते मरकजमध्ये सहभागी झाले होते का?
आयसोलेशनमध्ये असलेल्या तिघांचाही तबलीगी जमातशी कोणताही संबंध नाही. ते केवळ दोन गाड्यातील माल खाली होण्यास 2-3 तासांचा अवधी असल्याने त्यातील तिघे निजामु्द्दीन येथे दर्ग्यात गेले होते. फक्त त्या परिसरात ते फिरले. त्यांना त्या परिसरात तबलिगी जमातचा कार्यक्रम आहे याची पुसटसी कल्पना नव्हती. त्या परिसरात काही वेळ घालवण्यानंतर ते परत गेले.

या तिघांचा तबलीगी जमातशी काय संबंध?
याबाबत आम्ही तबलीगी जमातच्या वणी प्रमुखाशी संपर्क केला असता त्यांनी या तिघांचा तबलिघी जमातशी कोणताही संबंध नसून या प्रकरणाशी विनाकारण तबलीगीचे नाव जोडण्यात आले. याशिवाय ते लोक पूर्वीही कधी तबगलिघीशी जुळलेले नव्हते. काही लोकांनी जाणूनबुजून या तिन लोकांचा संबंध तबलिघीशी जोडत सोशल मीडियावरून काही मॅसेज फिरवले. परिणामी आम्हाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. – मो. इरफान. मो. रज्जाक, तबलिघी जमात वणी

चौघांचा रिपोर्ट कधी येणार?
पाच पैकी रविनगर येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी आला असून तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे वणीकरांनी काही प्रमाणात सुटकेचा निश्वास सोडला. आता फक्त उर्वरित चौघांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. रिपोर्ट काल शुक्रवारी येणे अपेक्षीत असताना नागपूर येथील लॅबमधले तपासणी यंत्रात तांत्रिक बिघाड झाला. परिणामी त्यांचा रिपोर्ट यायला आणखी वेळ लागू शकतो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.