बहुगुणी डेस्क, वणी: बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉट विक्री करून ₹1.20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यात तोतया प्लॉट मालक, दलाल यांच्यासह तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याचा समावेश होता. मात्र या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या सतीश पुंडलीकराव केराम (रा. ओमनगर चिखलगाव, वणी) याला अटक करण्यात आली आहे. तर शैलेश दादाजी वाकडे (रा. बाबुपेठ, चंद्रपूर) हा फरार आहे. यासह तलाठी रविंद्र निळकंठ उपरे आणि मंडळ अधिकारी राजू निळकंठराव डोंगरे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी एक आठवड्याआधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून सर्व आरोपी फरार होते. शनिवारी मुख्य आरोपी केराम हा पांढरकवडा न्यायालयात जामीनासाठी आला होता. न्यायालयाने त्याचा जामीन नामंजूर केला. त्यानंतर वणी पोलिसांनी केराममला तात्काळ अटक केली. तर आरोपी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. मात्र प्लॉट विक्री करणारा तोतया मालक शैलेश वाकडे हा मात्र अद्यापही मोकाट आहे.
काय आहे हे प्रकरण?
फिर्यादी सूरज रमेश चाटे (वय 29, रा. जत्रा रोड, वणी) हे खासगी नोकरीसोबत पत्रकारिता करतात. जुलै 2024 मध्ये मौजा वडगाव (धं)सूरज चाटे यांनी मौजा वडगाव (धं) येथील प्लॉट खरेदीसाठी आरोपी सतीश केराम यांच्या माध्यमातून व्यवहार केला होता. प्लॉट शैलेश वाकडे यांच्या नावावर असल्याचे सांगत फेरफार, सातबारा उतारा व नकाशा दाखविण्यात आला. तलाठी रविंद्र उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांनीही कागदपत्रे खरी असल्याचे सांगितल्याने फिर्यादी आणि त्यांच्या परिचितांनी 19 जुलै 2024 रोजी ₹1.20 लाखांमध्ये प्लॉटचा सौदा केला.
मात्र, सप्टेंबर 2024 मध्ये प्लॉटची मोजणी करताना संबंधित जागा दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे उघड झाले. यानंतर महसूल विभागाच्या चौकशीत फेरफार व कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आल्याने ते रद्द करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ वणीतील पत्रकारांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी शैलेश वाकडे, सतीश केराम, तलाठी रविंद्र उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांच्याविरुद्ध BNS कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.



Comments are closed.