त्रस्त शेतकऱ्याने घेतला चिंचेच्या झाडाला गळफास
सततची नापिकी आणि पत्नीच्या आजारपणामुळे होते त्रस्त
भास्कर राऊत, मारेगाव: सततची नापिकी, नेहमी पडणारा दुष्काळ आणि अशातच गेल्या काही वर्षांपासून अंथरणाला खिळून असलेल्या पत्नीच्या आजाराला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना तालुक्यातील रामेश्वर येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव रघुनाथ महादेव देऊळकर (60) असे आहे.
रघुनाथ देऊळकर हे सकाळी वाजताच्या दरम्यान बकऱ्यांसाठी चारा आणतो म्हणून निघून गेले. घरी लवकर परत न आल्याने घरच्यांनी शोध घेतला असता सिंधी ते रामेश्वर या शेतशिवारात एका चिंचेच्या झाडाला रघुनाथ यांचा मृतदेह लटकून असलेला दिसला. रघुनाथ देऊळकर यांना 5 एकर कोरडवाहू शेती असून त्यांना तीन मुले आहेत.
सततच्या नापिकीने आणि दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळाने त्रासलेले होते. तसेच घरी पत्नी मागील काही वर्षांपासून आजारी असल्याने आणि योग्य परिस्थिती नसल्याने मेटाकुटीला आलेले होते. नापिकीने आणि आजार यामुळे पत्नीचा इलाज कसा करायचा या विवंचनेत ते होते. त्यामुळे त्यांनी या सर्वांना कंटाळून आज दि. 25 नोव्हेंबरला झाडाला लटकवून आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंड आहेत.
सदर घटनेची नोंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून मृतकाचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला आहे. मारेगाव तालुका आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जाऊ लागला असून येथे सततच्या आत्महत्येच्या घटनेने समाजमन ढवळून निघालेले आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.