मोहोर्ली येथील शेतक-यांचे वीजेसाठी उपोषण

उपकेंद्रासाठी ग्रामस्थांनी जागा देऊनही गावक-यांना वीज नाही

0

वणी: वणी तालुक्यातील मोहोर्ली येथे उपकेंद्र होऊनही येथील शेतक-यांना पुरेशी वीज मिळत नाही. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करूनही महावितरण कंपनीनं दुर्लक्ष केल्यानं अखेर मोहोर्लीच्या ग्रामस्थांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. 24 तास विद्युत पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शुक्रवारपासून शेतक-यांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे. वणीतील तहसिल कार्यालयासमोर त्यांचं उपोषण सुरू आहे.

वणी शहरापासून अगदी 5 किलोमीटर अंतरावर मोहोर्ली हे गाव आहे. या गावात वीजेचा सारखा लपंडाव सुरू असतो. येथील ग्रामस्थांनी विद्युत वितरण कंपनीला उपकेंद्र तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्या जागेवर विद्युत महावितरण कंपनीनं उपकेंद्र सुध्दा तयार केलं आहे. मात्र उपकेंद्र असतानाही परिसरातील शेतक-यांना पुरेशी वीज मिळणं कठीण झालं आहे.

यावर्षी पाऊस सुध्दा जेमतेम आहे. कित्येक शेतक-यांची तिबार पेरणी झाली आहे. पाण्याची पुरेशी सोय उपलब्ध असताना फक्त वीजेचा पत्ताच नसल्यानं शेतातील पीकं करपायला लागली आहे. मोहोर्ली येथील बहूतांश शेतकरी अर्धा एकर बागायती शेती करून कुटुंबाचा गाडा हाकत आहे. मात्र विद्युत पुरवठा अपुरा पडत असल्यानं भाजीपाला पीकं घेणं सुध्दा कठीण झालं आहे.

(“साहेब, कर्जामुळे मी आत्महत्या करतोय” कर्जबाजारी शेतकऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, आणि मग….)

येथील शेतक-यांनी याआधी विद्युत महावितरण कंपनीला वीज समस्येबाबत तक्रारी, निवेदनं सुध्दा दिली आहे. पण त्यांच्या मागणीकडे विद्युत विभागानं दुर्लक्ष केलं, त्यामुळे अखेर मोहोर्ली गावातील शेतक-यांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जर विद्युत महावितरण कंपनीनं दखल न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा बदलून आमरण उपोषण करण्याचा इशारा उपोषणकर्त्या शेतक-यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.