देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्यातील माथार्जुन येथील शेतकरी गजानन हनमंतु नैताम यांना बुधवारला कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाली. गजानन हा शेतात कीटकनाशक फवारणी करण्यासाठी सकाळी गेले असता दिवसभर फवारणी केल्यानंतर सायंकाळी घरी आल्यावर त्यांना अचानक अस्वस्थपणा जाणवू लागला. त्यानंतर त्यांवा अचानक ओकारीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पांढरकवडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या कपाशी, तूर हे शेतकर्यांचे मुख्य पीक आहे. त्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी महागडे औषध घेऊन शेतकरी पिकावर फवारणी करतात, परंतु पीक वाचविण्याच्या नादात शेतकर्यांच्याच जीवाला धोका निर्माण होत आहे.
यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे; मात्र पिकावर कीटकनाशकाची फवारणी केल्याशिवाय पर्याय नाही. अगोदरच अत्यल्प पावसामुळे पिकाचे नुकसान होत आहे. त्यातच अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यक बनलेले आहे; परंतु कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.