Exclusive: फवारणीतून विषबाधा झालेल्या मजुराच्या विधवेची प्रशासनाकडून थट्टा

आदिवासी महिलेची प्रमाणपत्रासाठी वणवण, कृषी विभागानेही फिरविली पाठ

0

रवि ढुमणे, वणी: सध्या फवारणीतून विषबाधा होऊन अनेक शेतकरी तथा शेतमजुरांना प्राणाला मुकावे लागल्याच्या घटना घडत आहे. अशीच घटना झरीजामनी तालुक्यातील निमणी येथे घडली. यात एका मजुराचा मृत्यू झाला होता. परंतू अद्याप पीडित कुटुंबातील विधवेला प्रमाणपत्र मिळाले नसल्याने तिला वणवण भटकंती करावी लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या विधवेकडे कृषी विभागाने पाठ फिरवली तर ग्रामसेवक महिनाभरापासून बेपत्ता आहे. आता पीडित आदिवासी महिलेने न्याय मागावा कोणाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात फवारणीसाठी लागणाऱ्या आंतरप्रवाही कीटकनाशक औषधाने अनेकांना विषबाधा होऊन प्राण गमवावे लागल्याचे जणू सत्रच सुरू झाले आहे.  झरीजामनी या आदिवासी तालुक्यातील निमणी येथील सुरेंद्र वैद्य यांच्या शेतात फवारणी साठी गेलेल्या कैलास विठ्ठल पेंदोर (३५) या शेतमजुराला १६ ऑगष्टला शेतात कपाशीवर फवारणी करून घरी परतल्यानंतर रात्री अस्वस्थ वाटू लागले.  कैलासची पत्नी प्रेमीलाच्या ही बाब लक्षात येताच तिने सुरेंद्र वैद्यच्या घराकडे धाव घेतली. सुरेंद्र वैद्य यांनी क्षणभर वेळ न दवडता लागलीच कैलास ला पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र कैलासची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच रात्री पुढील उपचारासाठी त्याला यवतमाळ येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. यवतमाळ येथील रुग्णालयात कैलासवर पहाटे उपचार सुरू करण्यात आले.

तब्बल २१ दिवस उपचार झाल्यानंतर अखेर कैलासची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली. पण शासनाकडून कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून मिळणारा मोबदला मिळाला नाही. मोबदल्यासाठी लागणारे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रेमीला रोज वाट बघत आहे, मात्र निमणी येथील ग्रामसेवकच बेपत्ता असल्याचे सुरेंद्र वैद्य यांनी सांगितले आहे.

कृषी विभागाने तर चक्क या आदिवासी पीडित विधवा महिलेकडे जणू पाठच फिरविली आहे. प्रशासनातील कामचुकार अधिकाऱ्यामुळे पीडित आदिवासी विधवा मोबदल्यापासून जणू वंचितच राहिली असल्याचा प्रत्यय निमणी या आदिवासी बहुल गावात बघायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पीडितेला मदत
निमणी येथील आदिवासी शेतमजुराचा फवारणीतुन झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू होऊन कैलास च्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. घरात पत्नी प्रेमीला ७ वर्षाचा चेतन आणि अडीच वर्षाचा महेश हे तीन जीव कैलासच्या कुटुंबात आहेत. त्यांचा आधारच हरविल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा लक्षात येताच त्यांनी तात्काळ १० हजार रुपयाची मदत दिली होती. परंतू केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना मायेचा पाझर फुटला नाही. अद्याप मृतक कैलास च्या कुटुंबाला कोणतीही शासकीय मदत अद्याप मिळालेली नाही.

खासदार नाना पटोले कडे पीडितेचे साकडे
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात फावरणीतून विषबाधा झालेल्या मृत शेकऱ्यांच्या घरी जाऊन गोंदिया भंडारा जिल्ह्यातील खासदार, तसेच भूमीपुत्र नानाभाऊ पटोले यांनी सांत्वन केले होते. मात्र जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री कोणीही फिरकले नव्हते त्यावेळी पटोले यांनी भेट दिली होती. मात्र केंद्रीय राज्यमंत्र्याचा मतदार संघात आशा दुर्दैवी घटना घडत असतांना त्यांच्याकडे वेळ नाही की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अद्याप निमणीत एकही लोकप्रतिनिधी फिरकले नसल्याचे दुःख सदर महिलेने बोलून व्यक्त केले आहे. खासदार नानाभाऊ पटोले यांनी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे साकडेच जणू पीडित विधवा महिलेने घातले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.