जुन्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; काठीने बेदम मारहाण

जुन्या वादातून संताप अनावर; शेतकरी गंभीर जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: जुन्या वादाचे पर्यवसान एका शेतकऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात झाले. गावातच वाट अडवून झालेल्या शाब्दिक वादानंतर आरोपीने घरासमोरील काठी उचलून शेतकऱ्याच्या डोक्यावर तसेच हात-पायावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी पुंडलीक घनशाम ठमके (45) हे मारेगाव तालुक्यातील आपटी येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करतात. गावातीलच नंदलाल उर्फ नंदू माधव आत्राम (55) याच्यासोबत त्यांचा काही काळापासून वाद सुरू होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शनिवारी (11 जुलै) दुपारच्या सुमारास पुंडलीक हे शेतात जाण्यासाठी घरातून निघाले असता, गावातच आरोपी नंदलाल याने त्यांची वाट अडवली. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच आरोपीने घरासमोरील काठी उचलून पुंडलीक यांच्यावर हल्ला चढवला. डोक्यासह हात-पायावर काठीने सपासप वार केल्याने ते गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी पुंडलीक यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर केले.

या प्रकरणी पुंडलीक ठमके यांच्या तक्रारीवरून आरोपी नंदलाल उर्फ नंदू माधव आत्राम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(2) आणि 296 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

Comments are closed.