भूमिअभिलेख कार्यालय विरोधात शेतकऱ्याचे उपोषण

भूमिअभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार सुरूच

भास्कर राऊत, मारेगाव: जमीन एकत्रीकरण योजने अंतर्गत क्षेत्र दुरुस्तीसाठी लक्ष्मीकांत गिरीजा शंकर तेलंग या शेतकऱ्याने येथील भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला. वारंवार मागणी करून आणि वरिष्ठ कार्यालयाने आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही न केल्याने सदर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी तहसील कार्यालया समोर मंगळवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

लक्ष्मीकांत तेलंग यांनी २०१९ मध्ये कान्हाळगाव शेत शिवारातील गट क्रमांक १२, १३, १४ च्या एकत्रीकरण योजने अंतर्गत दुरुस्ती बाबतचा अर्ज केला होता. उपसंचालक भूमिअभिलेख यांनी ही या संदर्भात मारेगाव भूमिअभिलेख कार्यालयाला आदेश देऊन कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता.

परंतु येथील भूमिअभिलेख कार्यालयाने शेतकऱ्यांची थट्टा करीत मोजणीसाठी घटना स्थळी उपस्थित राहण्याच्या सूचना देऊन एकदाही उपस्थित झाले नाही. त्यामुळे सदर शेतकरी त्रस्त झाला. काही दिवसा पूर्वी शेतकऱ्याने भूमिअभिलेख कार्यालयाला पत्र देऊन मोजणी करा अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.

परंतु भूमिअभिलेख कार्यालयाकडून उपोषणाच्या इशाराकडे सपशेल दुर्लक्ष करीत पत्राला केराची टोपली दाखविली. शेवटी त्रस्त शेतकऱ्याने ता.३० नोव्हेंबर पासून तहसील कार्यालया समोर उपोषणाला सुरुवात केली आहे. यापूर्वी सुध्दा भूमिअभिलेख कार्यालयाच्या कारभाराला कंटाळून हटवांजरी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती.

हे देखील वाचा:

पहिला डोस घेतल्यास दुसरा डोस न चुकता घ्या

तब्बल 27 दिवसानंतर वणी आगारातून धावली लालपरी

Comments are closed.