जितेंद्र कोठारी, वणी : दारू पिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. गुरुवारी 12 ऑक्टो. रोजी जुन्या वादातून भांडण होऊन एकाने बैलबंडीच्या उभारीने डोक्यावर मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी इसमाच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी आशिष मधुकर वरारकर (31) रा. भालर ता. वणी विरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
फिर्यादी वैशाली दिलीप भासपाले रा. भालर हिने शुक्रवारी रात्री वणी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा मोठा भाऊ नरेंद्र आनंदराव दोडके आणि गावातीलच आशिष मधुकर वरारकर या दोघांमध्ये दारू पिण्याच्या वादावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. गुरुवारी 12 ऑक्टो. रोजी सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान फिर्यादीचा भाऊ भालर बसस्टॉप जवळ पान ठेल्यावर गेला असता आरोपी आशीष वरारकर याने जुन्या वादातून त्याच्यासोबत भांडण केला. तसेच बैलबंडीच्या उभारीने त्याच्या डोक्यावर व हातावर गंभीर मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.
भालर येथे इसमावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे आणि ठाणेदार पो. नि. अजित जाधव यांनी घटनास्थळ भेट दिली. जीवघेणा हल्यात गंभीर जखमी नरेंद्र दोडके याला उपचाराकरिता वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अवस्था गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचाराकरिता नागपूर येथे पाठविण्यात आले. फिर्यादी वैशाली दिलीप भासपाले रा. भालर हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आशिष मधुकर वरारकर रा. भालर विरुद्ध कलम 307 भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि राजेश पुरी करीत आहे.
Comments are closed.