स्वीट मार्टला एफडीएचा दणका; परवाना रद्द

स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष; इतर ठिकाणीही कारवाई?

विवेक तोटेवार, वणी: राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार सध्या राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ व अस्वच्छतेविरोधात तीव्र मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा भाग म्हणून मुकुटबन येथील पुरोहित बेकरी अँड स्वीट मार्ट मध्ये गंभीर अस्वच्छता आढळून आल्याने प्रशासनाने कडक कारवाई करत दुकानाचा परवाना रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

यवतमाळ येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी डॉ. सचिन नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 22 ऑगस्ट रोजी पथकाने तपासणी केली. तपासणीदरम्यान स्वयंपाकघर व परिसरात स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले. दुकानालगत असलेल्या भाजीपाला बाजारामुळे परिसर आधीच अस्वच्छ होता; त्यात उंदरांचा वावर आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. पथकाने संपूर्ण परिस्थितीचे छायाचित्रण करून आवश्यक नोंदी घेतल्या. संबंधित संचालकाला स्वच्छतेबाबत कडक सूचना देण्यात आल्या. मात्र चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने कठोर निर्णय घेत 25 ऑगस्ट रोजी दुकानाचा परवाना रद्द केला.

एफडीएने स्पष्ट केले आहे की ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेसोबत स्वच्छताही अत्यंत महत्त्वाची असल्याने खाद्य व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. मुकुटबन येथील कारवाईतून प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला सोडले जाणार नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणीत कारवाई कधी?
मुकुटबन येथील कारवाईनंतर आता वणी शहरातही अन्न व औषध प्रशासनाची तपासणी होणार का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. स्थानिक पातळीवर अनेक स्वीट मार्ट, बेकरी व खाद्यपदार्थ विक्री केंद्रे कार्यरत असून त्यातील स्वच्छतेची स्थिती तपासणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही मोहीम राज्यभर सुरू असून वणीसह सर्व ठिकाणी टप्प्याटप्प्याने तपासण्या होतील. त्यामुळे वणीतील कारवाई कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ अन्न पुरवले जावे, यासाठी ही मोहीम सुरूच राहणार असून वणीसह इतर ठिकाणीही तपासण्या व कारवाया होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

Comments are closed.