पुरुषोत्तम नवघरे, वणी: सायंकाळची वेळ… ईद-ए-मिलादचा रूट मार्च आटोपून पोलिसांचे पथक शिरपूरकडे परतत होते. चारगावजवळ अचानक समोरून दोन मालवाहू वाहने भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांचे वाहन दिसताच चालकांनी वाहने आणखी वेगाने पुढे दामटली. संशय बळावताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला आणि काही अंतरावर दोन्ही वाहने अडवली. झडती घेताच वाहनांच्या आतले दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला—कोंबून, निर्दयीपणे बांधून ठेवलेले तब्बल 4 बैल! या कारवाईत तब्बल 11.20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायर येथे रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. रूट मार्च संपल्यानंतर पोलीस पथक शिरपूर पोलीस ठाण्याकडे परतत असताना चारगावजवळ MH 29 CM 1157 आणि MH 29 CM 0664 क्रमांकाची दोन अशोक लेलँड मालवाहू वाहने भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांचे वाहन पाहताच दोन्ही वाहने वेगाने पुढे जात असल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही वाहने थांबवली. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये प्रत्येकी दोन बैल आढळून आले. पोलिसांच्या तक्रारीनुसार, बैलांना वाहनांमध्ये कोंबून व निर्दयीपणे बांधून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
वरोरा येथून आणलेत बैल
वाहनांमधील व्यक्तींची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे शनिदेवा शिवशंकर पांडे (वय 25), बादल खुशाल नगराळे (वय 22), रंजीत सुभाष कनाके (वय 30) आणि साहील बंडू खोके (वय 21) अशी सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींनी हे चारही बैल वरोरा येथून खरेदी करून कत्तलीसाठी तेलंगणातील बेला येथे सलीम कुरेशी याच्याकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे सलीम कुरेशी याच्यासह संबंधित व्यक्तींविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या चार बैलांची अंदाजे किंमत प्रत्येकी 30 हजार रुपये, तर दोन्ही मालवाहू वाहनांची किंमत प्रत्येकी 5 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अशा प्रकारे चार बैल व दोन वाहने मिळून एकूण 11.20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर चारही बैलांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना गुरु गणेश गो-रक्षण सेवाभावी संस्था, रासा, ता. वणी येथे देखभालीसाठी दाखल करण्यात आले.
या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी 5 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.


Comments are closed.