जितेंद्र कोठारी, वणी : निसर्गाने मनुष्याला माती, हवा, पाणी, प्रकाश यासारख्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्यात. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रत्येक मूलभूत वस्तूला उत्पादन बनवण्याच्या प्रवृत्तीमुळे संपूर्ण प्राण्यांच्या जीवनाची ही संपत्ती व्यापारी आणि कंपन्यांच्या घशात भरली जात आहे. सामान्यजनांच्या नळाला पाणी नसले तरी व्यावसायिकांच्या घागरी भरत आहेत, हे नक्की.
वणी शहरात सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अशा परिस्थितीमध्ये पाण्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे पाहायला मिळत आहे. मिनरल वॉटरच्या नावाखाली जारमधून अशुद्ध पाणीविक्रीचा गोरखधंदा शहरामध्ये जोरात सुरू आहे. यावर प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने शहराच्या गल्लीबोळामध्ये थंड व शुद्ध पाणी विकणारी वाहने दिवसभर धावत आहेत.
सुरुवातीला पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प रावबून व्यवसाय करणारे मोजकेच व्यावसायिक होते. नंतर या व्यवसायाने शहरात विशाल रूप धारण केले आणि मोमीनपूरा, शास्त्रीनगर, रंगनाथनगर, गोकुळनगर, MIDC, वासेकर ले आऊट, भीमनगर, टिळकनगर, गायकवाड फैलासह लगतच्या चिखलगांव, गणेशपूर, लालगुडा, मंदर या भागांत अनेक पाणी फिल्टर प्लांट सुरू झालेत.
कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये जास्त नफा कमावून देणारा व्यवसाय म्हणून पाणी विक्रीच्या व्यवसायाकडे पाहिले जाते. त्यातील शुद्धता हरवली. आता भूगर्भातील पाणी उपसून थंड करून विकण्यास कमी खर्च लागत आहे. त्यामुळे गल्ली-बोळामध्ये असे व्यवसाय सुरू झाले आहेत.
मात्र यामध्ये पाण्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही. तसेच त्यावर कोणतीही माहिती देण्यात येत नाही. काही ठिकाणी तर चक्क बोअरवेलमधून पाण्याचा उपसा करून थंड केलेले पाणी जारमध्ये भरून त्याची 10 ते 30 रुपये दराने विक्री केली जात आहे.
विविध सण, समारंभ, लग्न, पार्ट्या यासाठी नागरिक जारची मागणी करतात. तसेच अनेक नागरिक शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून दररोज घरामध्येही या जारची मागणी करतात. शासकीय कार्यालये, दुकाने यामध्येही जारच्या पाण्याला मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत.
गल्लोगल्ली फिरुन पाणीविक्रीमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सावध होऊन या अशुद्ध पाणी विक्रीला आळा घालायला हवा. पाणीविक्री करणारे व्यावसायिक नियमांमधून पळवाट काढत आहेत. पाण्याच्या जारवर आपल्या कंपनीचे लेबल लावून पाणी विक्री केली जाते.
*गल्लीबोळात अन् घरातच थाटले व्यवसाय*
कोणताही व्यवसाय सुरू करण्याकरिता नगरपालिका प्रशासन व ग्रामीण भागामध्ये प्रशासकीय परवानगी आवश्यक असते. सोबतच व्यवसायाचा परवानाही लागतो. परंतु पाण्याचे जार विक्री करणाऱ्या या व्यावसायिकांना कुठलीही नियमावली नसल्याने पाणी विक्री करणाऱ्यांचे फावले आहे. प्रशासनाची परवानगी न घेता घरीच एक खोली किंवा शेड टाकून पाण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
नगर परिषद व आरोग्य विभाग अनभिज्ञ
वणी नगर परिषद क्षेत्र व तालुक्यात खाजगी वॉटर फिल्टर प्लांटबाबत नगर परिषद, आरोग्यविभाग तसेच अन्न व औषध प्रशासन पूर्णतः अनभिज्ञ आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या व्यवसायाला वणी नगर परिषदला एकही रुपया टॅक्स मिळत नाही. पाणी हा मानवी आरोग्यास महत्वाचा घटक आहे. परंतु आजपर्यंत नगर परिषद, आरोग्यविभाग व अन्न व औषध प्रशासनाने एकही पाणी प्लांटमधून पाण्याचे नमुने तपासले नाही. तालुक्यात कोरोनाचा संकट असताना या महत्त्वाच्या बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.
पाणी फिल्टर प्लांटना नोटीस पाठविणार
नगर परिषद हद्दीत सुरू असलेले खाजगी पाणी विक्री व्यवसायिकांनी नगर परिषद कडून परवानगी घेतली नाही. तसेच पाणी फिल्टर प्लांट नगर परिषदेत टॅक्स भरत नाही. शुद्द पाण्याच्या नावावर नगर परिषद क्षेत्रांत पाणी विक्री करणाऱ्यांना चिंहित करून नोटीस पाठविण्यात येईल.
शुभम तायडे: जलापूर्ती व आरोग्य अभियंता, नगर परिषद, वणी
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)