अखेर आमदारांच्या लेखी आश्वासनानंतर भाकपचे आंदोलन मागे
बसस्थानकाचे बांधकाम करण्याच्या मागणीसाठी सुरू होते ठिय्या आंदोलन
नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव शहरात बसस्थानकाच्या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने येथील तहसील कार्यालय समोर 14 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या पूर्व दिनापासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेर आमदार बोदकुरवार यांच्या लेखी आश्वासनानंतर भाकपने आंदोलन मागे घेतले आहे.
मारेगाव शहरातील बसस्थानकाचे बांधकाम लवकर सुरू करण्याच्या प्रमुख मागणीसह अतिक्रमण धारकास कायम स्वरूपी पट्टे द्यावे, वनविभागाच्या जबाबदार उपसंरक्षक अधिकारी सह वनविभागाचे 200 अधिकारी कर्मचारी यांनी शेती पिकाचे नुकसान केल्या प्रकरणी कारवाई करणे, याबाबत नुकसानभरपाई द्यावी आदी मागणींसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने 14 ऑगस्ट स्वातंत्र दिनाच्या पूर्वदिनापासून तहसील कार्यालयासमोर भा. क.प. चे जिल्हासचिव बंडू गोलर, श्रीकांत तांबेकर, लता रामटेके, पुंडलिक ढुमणे, विठ्ठल रामपूरे आदींनी बेमुदत ठिय्या आंदोलन चालू केले होते.
दरम्यान 15 ऑगस्ट रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आंदोलनकर्त्यांना कोरोना संपताच बसस्थानकाचे शेड साठी आमदार निधीतून 10 लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे यांनी सुद्धा अतिक्रमित जमिनीच्या पुराव्याचे कागदपत्र पुरविल्यास, वनविभागाच्या वतीने सुद्धा नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर च भा.क.प.आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे.
यावेळी आमदार बोदकुरवार, तहसीलदार दीपक पुंडे, नायब तहसिलदार दिगांबर गोहोकार, ठाणेदार जगदीश मंडलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष चिकटे, शहर अध्यक्ष चिंचुलकर, नगरसेवक नांदे, प्रा.डॉ. माणिक ठिकरे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.