जितेंद्र कोठारी, वणी: न. प. पाणीपट्टी कराच्या स्वरूपात नागरिकांतून वसूल केलेल्या रक्कमेतुन तब्बल 17 लाख 34 हजार रुपयांची परस्पर अफरातफर करणाऱ्या वणी न.प.च्या कंत्राटी कर्मचाऱ्याला अखेर सोमवारी अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव अंकित रामचंद्र कोयचाडे असून मागील 3 महिन्यापासून तो फरार होता.
दि. 8 फेब्रुवारी सोमवारी आरोपी अंकित कोयचाडे हा गणेशपूर येथे आपल्या घरी असल्याची माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली. माहिती मिळताच डीबी पथकाचे पोउनि गोपाल जाधव यांनी पथकासह गणेशपूर गाठून आरोपीला अटक केली. आरोपीला मंगळवार 9 फेब्रुवारी रोजी न्यायालय समोर हजर करून पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याची माहिती पोउनि गोपाल जाधव यांनी दिली.
माहितीनुसार नगर परिषदमध्ये संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत अंकित रामचंद्र कोयचाडे याला पाणीपट्टी वसुलीची जवाबदारी देण्यात आली होती. अंकित कोयचाडे याने 1 एप्रिल 2019 ते 1 ऑक्टो. 2020 पर्यंत नगर परिषद सीमेतील नळधारकांकडून 71 लाख 33 हजार 110 रु. पाणीपट्टी कर वसूल केला. मात्र या कालावधीत वसूल केलेल्या शासकीय रक्कमेतून त्यांनी तब्बल 17 लाख 34 हजार 758 रु. नगर परिषद कोषागारमध्ये जमा न करता परस्पर अपहार केला.
पाणीकर वसुलीच्या हिशोबात गडबड होत असल्याची कुणकुण लागतच नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी प्रभारी मुख्याधिकारी यांना पत्र देऊन चौकशीचे आदेश दिले. तत्कालीन मुख्याधिकारी महेश रामगुंडे यांनी चार सदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची सखोल चौकशी केली. समितीने दि. 28 ऑक्टो.2020 रोजी सादर केलेल्या अहवालानुसार कंत्राटी कर्मचारी अंकित कोयचाडे यांनी आय. डी. व सर्व साधारण पावती यांची एकूण वसुली 71,33,710 रु .पैकी 53,98,342 रु. नगर परिषद मध्ये भरणा केले. तर उर्वरित 17,34,758 रुपयांचे हिशोब दिले नाही.
चौकशीनंतर नगर परिषद तर्फे जलापूर्ती अभियंता शुभम तायडे यांनी दि. 3 नोव्हें. 2020 रोजी वणी पोलीस ठाण्यात कंत्राटी कर्मचारी अंकित रामचंद्र कोयचाडे विरुद्द शासकीय रक्कमेचा अपहार केल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी अंकित रामचंद्र कोयचाडे (वय 25), रा. वणी विरुद्ध भा.दं.वि. कलम 409 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच आरोपी अंकित कोयचाडे यांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पांढरकवडा सत्र न्यायालयात अग्रीम जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केले. मात्र सत्र न्यायालयातून जामीन अर्ज फेटाळण्यात आले. तेव्हापासून आरोपी फरार होता. वणी पोलिसांनी आरोपीच्या शोधात अनेक ठिकाणी रेड केली. मात्र आरोपी सतत ठिकाण बदलून पोलिसांना चकमा देत असे.
नगर परिषदेत अनेकांचे जीव टांगणीला
पाणीपट्टी वसुलीच्या लाखों रुपये अपहार प्रकरणी नगर परिषद लेखा विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची जोरदार चर्चा होती. आरोपीस अटक झाल्यानंतर लेखा विभागातील अनेकांचे जीव टांगणीला आले आहे. आरोपीला पोलीस कोठडी मिळाल्यास घोटाळ्यात इतर काही नाव उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा: